कोरोना संचारबंदीचा एसटीला दररोज ३५ लाखांचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:38 AM2021-04-28T04:38:15+5:302021-04-28T04:38:15+5:30

भंडारा : लोकवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसेसचे पुन्हा एकदा चाक थांबले आहे. कोरोना संचारबंदीच्या काळात परिवहन महामंडळाच्या ...

Corona curfew hits ST at Rs 35 lakh per day | कोरोना संचारबंदीचा एसटीला दररोज ३५ लाखांचा फटका

कोरोना संचारबंदीचा एसटीला दररोज ३५ लाखांचा फटका

Next

भंडारा : लोकवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसेसचे पुन्हा एकदा चाक थांबले आहे. कोरोना संचारबंदीच्या काळात परिवहन महामंडळाच्या भंडारा विभागाला दररोज ३५ लाखांचा फटका बसत आहे. सध्या सुरू असलेल्या ८ बसेसच्या माध्यमातून महामंडळाला रोज २५ ते ३० हजार रुपये उत्पन्न मिळत आहे. पहिल्या लाॅकडाऊनपेक्षाही यावेळी स्थिती गंभीर झाल्याचे दिसत आहे.

राज्य परिवहन महामंडळाच्या भंडारा विभागात गोंदिया जिल्ह्याचाही समावेश आहे. सहा आगार असून, ३८१ बसेस आहेत. भंडारा विभागाला पूर्वी दररोज साधारणत: ३६ लाख रुपयांचे मिळत होते. सर्व बसेस रस्त्यावर धावत होत्या, परंतु १४ एप्रिलच्या मध्यरात्रीपासून कोरोना संचारबंदी जारी झाली. याचा फटका राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसला झाला आहे. केवळ २२ प्रवासी वाहून नेण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, कोरोना संसर्गाच्या उद्रेकाने २२ प्रवासीही मिळणे कठीण झाले आहे. सद्यस्थितीत केवळ ८ बसेस रस्त्यावर धावत आहेत. त्यात भंडारा-नागपूर आणि गोंदिया - नागपूर यासह तिरोडा मार्गावर एक बस धावते.

राज्य परिवहन महामंडळाचे भंडारा आगाराचे भारमान ५८ वरून २९ पर्यंत खाली आले आहे. प्रवासीच मिळत नसल्याने बसेस बंद आहेत. चालक आणि वाहकांना एक दिवस आड ड्युटी दिली जाते. एसटी महामंडळाचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे महामंडळाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पगाराचाही प्रश्न निर्माण झाला आहे. पहिल्या लाॅकडाऊनमध्ये तर तीन महिने पगारच झाला नव्हता. यावेळी मार्च महिन्याचा कसाबसा पगार झाला, परंतु एप्रिल महिन्यात पगार होतो की नाही, अशी शंका राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना आहे.

बाॅक्स

सोमवारचे उत्पन्न ३० हजार रुपये

दररोज ३६ ते ३७ लाख उत्पन्न मिळविणाऱ्या भंडारा विभागाला सोमवारी निच्चांकी उत्पन्न झाले. १,५३३ किलोमीटर बस धावल्यानंतर महामंडळाला केवळ ३० हजार रुपये मिळाले. विशेष म्हणजे, आठवड्याचा पहिला दिवस असतानाही निच्चांकी उत्पन्न मिळाले. नागरिकांनी कोरोना संसर्गामुळे एसटी कडे पाठ फिरविली असून, सर्व बस स्थानकावरही शुकशुकाट दिसून येत आहे.

कोट

राज्य परिवहन महामंडळाला संचारबंदीचा मोठा फटका बसत आहे. उत्पन्न ठप्प झाले असून, शिवशाही बसही बंद आहे. एसटीचे पर किलोमीटर अर्निंग २२ रुपयांवरून १५ रुपयापर्यंत खाली आले आहे. या संकटाच्या काळात एसटी महामंडळ अत्यावश्यक सेवेसाठी तत्पर आहे.

-डाॅ.चंद्रकांत वडस्कर, विभागीय वाहतूक अधिकारी

Web Title: Corona curfew hits ST at Rs 35 lakh per day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.