कोरोनाने हिरावले ४६६ महिलांच्या कपाळावरील कुंकू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:24 AM2021-06-11T04:24:29+5:302021-06-11T04:24:29+5:30
शासनाने मंत्रालयीन स्तरावर जरी बालकांना बालसंगोपन योजनेसाठी मदत देण्याची घोषणा केली असली तरी अद्याप यासंदर्भात कोणताही शासन निर्णय निघालेला ...
शासनाने मंत्रालयीन स्तरावर जरी बालकांना बालसंगोपन योजनेसाठी मदत देण्याची घोषणा केली असली तरी अद्याप यासंदर्भात कोणताही शासन निर्णय निघालेला नाही. जिल्ह्यात ५०७ बालकांनी आपल्या पालकांना गमावले आहे. आता कोरोनाची दुसरी लाट हळूहळू ओसरू लागली आहे. मात्र कोरोनाने जीव गमावलेल्या त्या कुटुंबीयांवर संकट कोसळले आहे. सर्वाधिक नुकसान दोन्ही पालक गमावलेल्या बालकांचे झाले आहे. ज्या बालकांची काळजी घेणारी कोणीही नाहीत अशा बालकांना शासन मदतीचा हात मिळवून देण्यासाठी जिल्हास्तरावर कृती दल स्थापन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा महिला बालविकास अधिकारी विजय नंदागवळी यांनी दिली. शोधमोहीम सुरूच असून अजूनही अशा बालकांसह कोरोनामुळे विधवा झालेल्या महिलांचाही शोध घेतला जात आहे.
बॉक्स
कोरोनाने ४६६ महिलांना केले निराधार
जिल्ह्यात कोरोना संसर्गाची दुसरी लाट महाभयंकर होती. यामध्ये वर्षभरात झाले नाहीत एवढे मृत्यू एप्रिल २०२१ या महिन्यात झाले होते. त्यामुळे सर्वजणच धास्तावले होते. आता कोरोनाची करू ना रुग्णांचा आकडा कमी होऊ लागला आहे, मात्र एप्रिल महिन्यात घेतलेल्यां मध्ये जिल्ह्यातील ४६६ महिलांना निराधार केले आहे. जिल्हा महिला बाल विकास अधिकारी कार्यालयातर्फे शोधमोहीम सर्वेक्षण सुरू आहे, अशा महिलांना भेटून मार्गदर्शन व शासनाची मदत देण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
बॉक्स
येथे मिळेल बालसंगोपन योजनेचे अर्ज
कोरोनाच्या संसर्गाने ०१ मार्च २०२०पासून आजपर्यंत एक पालक गमावलेल्या ० ते १८ वयोगटातील बालकांसाठी बालसंगोपन योजनेचे अर्ज जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय येथे वितरित करण्यात येत आहे. सदर योजनेअंतर्गत कोरोनाने पालकांना गमावलेल्या या बालकांना बाल संगोपनाकरिता ११०० रुपये प्रतिमाह प्रस्तावित आहे. १० जूनपर्यंत प्राप्त माहितीनुसार जिल्ह्यात आई-वडील दोन्ही मृत पावलेले ६ बालके आहेत, तर एक पालक गमावलेले एकूण ५१५ बालक असून, यामध्ये आई मृत पावलेली ४६ बालके तर वडील मृत पावलेले ३६९ बालके असून, या संबंधातून माहिती संकलित करण्याचे काम अजूनही सुरूच असल्याची माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विजय नंदागवळी यांनी दिली.
बॉक्स
असा करा अर्ज
जिल्ह्यात कोरोना संसर्गामुळे काही महिलांचा पती हिरावला आहे. त्यामुळे जिल्ह्यात ४६६ महिला या विधवा झाल्या आहेत. या महिलांना जिल्हा महिला बालविकास कार्यालयातर्फे बाल संगोपनासाठी मदत मिळते. मात्र या महिलांना जिल्हा महिला बालकल्याण कार्यालयात येऊन अर्ज करावा लागणार आहे. यासोबतच लागणारी कागदपत्रे व अन्य गोष्टींबाबत कार्यालयात मार्गदर्शन केले जात आहे. पूर्वी बालसंगोपनासाठी ४२५ रुपये महिना मदत मिळत होती. आता हीच मदत ११०० रुपये मिळणार आहे. त्यामुळे गरजू व पात्र महिलांनी शिवाजी स्टेडिअम भंडारासमोरील जिल्हा महिला बाल कल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा.