कोरोना मृतांच्या वारसांना मदतीचा ‘तो’ मेसेज बनावट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 05:00 AM2021-06-18T05:00:00+5:302021-06-18T05:00:04+5:30
कोरोना संसर्गात अनेकांचा बळी गेला. अशा बळी गेलेल्या व्यक्तींना केंद्र सरकारकडून चार लाख रुपयांची मदत देण्यात येत असल्याचा एक संदेश सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या मेसेजसोबत एक अर्जही देण्यात आला आहे. हा अर्ज जिल्हा प्रशासनाला दिल्यानंतर मदत मिळेल, असे या मेसेजमध्ये म्हटले आहे. अनेकांचा त्याच्यावर विश्वास बसत आहे. अनेक जण जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन चौकशी करीत आहेत.
लाेकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : कोरोना संसर्गाने मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या वारसांना चार लाख रुपयांची मदत केंद्र सरकार देत असल्याचा एक मेसेज सोशल मीडियातून सध्या व्हायरल होत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. या मेसेजबाबत जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधला असता, व्हायरल मेसेज बनावट असून, अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन त्यांनी केले. विशेष म्हणजे ४ लाखांच्या मदतीचा केंद्राने काढलेला आदेश त्याच दिवशी मागे घेण्यात आला. मात्र, तोच आदेश सध्या व्हायरल होत आहे.
कोरोना संसर्गात अनेकांचा बळी गेला. अशा बळी गेलेल्या व्यक्तींना केंद्र सरकारकडून चार लाख रुपयांची मदत देण्यात येत असल्याचा एक संदेश सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या मेसेजसोबत एक अर्जही देण्यात आला आहे. हा अर्ज जिल्हा प्रशासनाला दिल्यानंतर मदत मिळेल, असे या मेसेजमध्ये म्हटले आहे. अनेकांचा त्याच्यावर विश्वास बसत आहे. अनेक जण जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन चौकशी करीत आहेत. लाखांदूर, साकोली आणि ग्रामीण भागातून अनेक जण पदरमोड करून जिल्हा कचेरीत पोहोचत आहेत. परंतु, तेथे त्यांना अशी कोणतीही योजना नसल्याचे सांगितले जाते.
याबाबत सविस्तर माहिती घेण्याचा प्रयत्न केला. केंद्रीय गृह विभागाच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने १४ मार्च २०२० रोजी एक परिपत्रक काढले होते. त्यात मृताच्या वारसांना चार लाख रुपयांचे अर्थसाहाय्य देण्याचे घोषित करण्यात आले होते. परंतु, त्याच दिवशी दुसरे परिपत्रक काढून पहिले परिपत्रक मागे घेतले. मात्र, आजही पहिलेच परिपत्रक सोशल मीडियातून व्हायरल होत आहे. त्याचा मनस्ताप नागरिकांना होत आहे. कोरोना बळींच्या वारसांसाठी सध्यातरी अशी कोणतीच योजना नाही. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
अनेकांना होतोय मनस्ताप
- आधीच कोरोनाने घरातील व्यक्ती हिरावून नेला. त्या दु:खात असताना असे बनावट संदेश व्हायरल होत आहेत. मदतीच्या आशेने अनेक जण जिल्हा मुख्यालय गाठून याबाबत चौकशी करतात. परंतु, तेथे अशी योजना नसल्याचे त्यांना सांगितले जाते. त्यामुळे त्यांना मनस्ताप सहन करावा लागतो. तसेच आर्थिक फटकाही बसतो. अशा अफवांवर विश्वास न ठेवलेलाच बरा. सोशल मीडियाच्या माध्यमातुन अनेकदा बनावट मॅसेज व्हायरल होतात. कोणतीही खात्री न करता ते फाॅरवर्ड केले जातात. जवळच्या व्यक्तीने पाठविलेला संदेश खराच असेल असे समजून त्यावर विश्वास ठेवला जातो. त्यामुळे एखादा संदेश पाठविण्यापूर्वी त्याची खात्री करणे तेवढेच महत्वाचे आहे.