डोंगरी मॅग्निज खाणीत कोरोनाचा शिरकाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:35 AM2021-04-16T04:35:42+5:302021-04-16T04:35:42+5:30
तुमसर : जगप्रसिद्ध डोंगरी येथील मॅग्निज खाणीत कोणाचा शिरकाव झाला आहे. येथील दोन कामगारांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. ...
तुमसर : जगप्रसिद्ध डोंगरी येथील मॅग्निज खाणीत कोणाचा शिरकाव झाला आहे. येथील दोन कामगारांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे कामगार वर्गात व परिसरातील नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. सदर खाण बंद करावी, यासाठी खासदार प्रफुल्ल पटेल व आमदार राजू कारेमोरे यांनी मध्यस्ती करावी, अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश रहांगडाले व बाळापूरचे उपसरपंच विनोद बुराडे यांनी केली आहे.
तालुक्यातील डोंगरे बुज. येथे भारत सरकारची मॅग्निज खाण आहे. या खाणीत मोठ्या संख्येने कामगार कार्यरत आहेत. त्यांचा संपर्क परिसरातील नागरिकांशी येतो. मॅग्निज खाणीत परप्रांतीय ट्रकांची वाहतूकही सुरू आहे. येथील दोन कामगारांचा कोरोना संसर्ग झाल्याने मृत्यू झाला. त्यामुळे कामगार वर्गात भीतीचे वातावरण आहे. अनेक कामगारांचे राहणे हे परिसरातील गावात आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये मोठी भीती आहे.
मॅग्निज खाणीत रोजंदारी कामगारांची संख्या मोठी आहे. कोरोना संसर्गाच्या नियमांच्या येथे पालन करण्यात येते; परंतु येथे संसर्गाचा धोका अधिक आहे.
पहिल्या लॉकडाऊन काळात डोंगरी बुज. येथील मॅग्निज खाण जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशामुळे बंद करण्यात आली होती. मागील संसर्गांपेक्षा सध्याचा संसर्ग जास्त आहे. त्यामुळे काही दिवस ही खाण बंद करावी, यासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश रहांगडाले व बाळापूरचे उपसरपंच विनोद बुराडे यांनी खासदार प्रफुल पटेल व तुमसरचे आमदार राजू कारेमोरे यांना मध्यस्थी करण्याची मागणी केली आहे.
कोट
डोंगरी बुज. ही खाण केंद्र सरकारची असून, ती अत्यावश्यक सेवेमध्ये मोडते. त्यामुळे खाण बंद करण्याचा निर्णय केंद्र सरकार व स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांना आहे. खाणीत कोरोना संसर्ग होऊ नये, त्या सर्व नियमांचे पालन करण्यात येते. कामगारांची तपासणी सुरू असून, लसीकरण करण्यात येत आहे.
राजेश भट्टाचार्य, अभिकर्ता डोंगरी बुज. माईन्स.