रविवारी कोरोनाने १५ जणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:33 AM2021-04-12T04:33:37+5:302021-04-12T04:33:37+5:30
भंडारा : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत भंडारा जिल्हाला महामारीने विळख्यात घेतले की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे. जिल्हा प्रशासनाच्या ...
भंडारा : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत भंडारा जिल्हाला महामारीने विळख्यात घेतले की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे. जिल्हा प्रशासनाच्या आवाहनानंतरही नागरिकांची बेफिकिरी आता अंगलट येऊ लागली आहे. सलग दुसऱ्या दिवशीही कोरोनामुळे १५ जणांचा मृत्यू झाला असून १४४६ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळले आहेत. उल्लेखनीय म्हणजे मृत्यू पावलेल्या व्यक्तींपैकी ८ व्यक्ती हे एकट्या भंडारा तालुक्यातील आहेत.
भंडारा जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत अत्यंत वेगाने वाढ होत आहे. या वाढीमुळे जिल्हा प्रशासनाचे टेंशन अधिकच वाढले आहे. त्यातच भर म्हणून कोरोना ग्रस्तांचा मृत्यूचा आकडाही दिवसागणिक फुगत चालला आहे. आतापर्यंत ४२० व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. रविवारी आठ हजार ४६९ व्यक्तींची तपासणी करण्यात आली. त्यापैकी १४४६ व्यक्तींचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.
रविवारी ७२६ व्यक्ती कोरोनामुक्त झाले असून आजपर्यंत १८ हजार २० व्यक्ती बरे होऊन घरी परतले आहेत. जिल्ह्यात सक्रिय कोरोना बाधितांची संख्या ९८११ इतकी आहे. रविवारी आढळलेल्या एकूण रुग्णांपैकी भंडारा तालुक्यात ५२७, मोहाडी ११४, तुमसर १४७, पवनी २०८, लाखनी १९६, साकोली १८४ तर लाखांदूर तालुक्यातील ७० रुग्णांचा समावेश आहे.
बॉक्स
नागरिकांची बेफिकिरी अंगलट
गतवर्षीच्या तुलनेत यावेळी कोरोना बाधितांची संख्या दुप्पट-तिप्पट पटीने वाढत असल्याचे दिसून येत आहे. ऑगस्ट २०२० मध्ये एकाच दिवशी २९७ अशी रुग्ण संख्या आढळली होती. त्यानंतर आज ११ एप्रिल रोजी तब्बल १४४६ कोरोनाबाधीत आढळले आहेत. आजपर्यंत रुग्णवाढीचा हा उच्चांक आहे. विशेष म्हणजे मृत्यू संख्याही झपाट्याने वाढत असल्याने टेन्शन अधिकच वाढत आहे. याचा ताण प्रशासकीय यंत्रणेवर बसत आहे. नागरिकांची बेफिकिरी व नियमांना दिलेली तिलांजली आता रुग्णवाढीच्या स्वरूपाने समोर येत आहे. आजही अनेक नागरिक विना मास्क व सोशल डिस्टंसिंगचा नियम पाळत नसल्याचे दिसून येते. नागरिकहो असे काय? वागता? असे म्हणण्याची वेळ आली आहे. किंबहुना आता प्रशासनाला कठोर पाऊल उचलावे लागणार काय? अशी स्थिती नागरिकांनीच बनवून दिली आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.
बॉक्स
अशी आहे तालुकानिहाय मृत्यूसंख्या
जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाने ४२० लोकांचा मृत्यू झाला आहे. यात सर्वाधिक मृत्यू भंडारा तालुक्यात झाले आहे. भंडारा तालुक्यातील २०६ व्यकींचा कोरोनोने मृत्यू झाला आहे. याशिवाय त्यात मोहाडी तालुक्यातील ३६, तुमसर ६७ पवनी ४३, लाखनी २१, साकोली २९ तर लाखांदूर तालुक्यातील १८व्यक्तींचा समावेश आहे.