कोरोनामुळे लहान मुले झाली ‘मोटू’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:22 AM2021-07-05T04:22:11+5:302021-07-05T04:22:11+5:30
भंडारा : गतवर्षी म्हणजे मार्च २०२०पासूनच कोरोनामुळे जिल्ह्यातील शाळा बंद आहेत. शाळा सुरू झाल्या तरी त्या अल्पावधीसाठी राहिल्या. शाळा ...
भंडारा : गतवर्षी म्हणजे मार्च २०२०पासूनच कोरोनामुळे जिल्ह्यातील शाळा बंद आहेत. शाळा सुरू झाल्या तरी त्या अल्पावधीसाठी राहिल्या. शाळा बंद असल्याने खेळण्या-बागडण्याच्या दिवसात लहान मुलांची जीवनशैली अक्षरशः बदलून गेली आहे. याचा परिणाम मुलांच्या आरोग्यावर झाल्याचे दिसून येतो. शाळा बंद असल्याने घरात बसूनच ऑनलाइन अभ्यासामुळे लहान मुलांना वजनवाढीचा धोका वाढला आहे.
पूर्व प्राथमिक, प्राथमिक शाळांमध्ये जाणारी लहान मुले मार्च २०२०पासून घरातच आहे. जवळपास एक वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला असून, ही मुले घरातच बंदिस्त असल्यासारखी आहेत. यातच लॉकडाऊन व कोरोनाचा धोका लक्षात घेता मुलांना घराबाहेर पडण्यास मज्जाव करण्यात येत असतो. घराजवळील क्रीडांगणावरही एकत्रित खेळायला जाणाऱ्या मुलांची संख्याही चांगलीच रोडावली आहे. सर्व शाळा आणि शिकवणी वर्ग बंद असल्याने मुलांचे दररोजचे वेळापत्रक सर्वसाधारणपणे बदलेले आहे. सध्या लहान मुले दिवसभर घरात राहत कंटाळत असतात. याव्यतिरिक्त मोबाइल व फास्ट फूडचा वापरामुळेही लहान मुले मोटू झाली की काय असे जाणवत आहे. याकडे पालकांनी लक्ष देणे गरजेचे आहे.
बॉक्स
वजन वाढले कारण
शाळा बंद असल्याने लहान मुलांच्या शारीरिक तसेच मानसिक आरोग्यावरही परिणाम दिसून येतो. शाळेत एकत्रितपणे खेळणे-बागडण्यामुळे त्यांचा शारीरिक व्यायाम होत असतो. मात्र घरातच राहणे त्यामध्ये स्थूलपणा वाढतो. व्यायाम तसेच सायकलिंग बंद झाल्याने मोटूपणा वाढल्याचे दिसून येते. मैदानी खेळ बंद झाल्याने धोका वाढला आहे.
बॉक्स
वजन कमी करण्यासाठी ही घ्या काळजी
लहान मुलांमध्ये जंकफूडचे मोठे आकर्षण असते. ते बंद झाले पाहिजे. हॉटेलचे जेवण तसेच चिप्स या बाबी देणे टाळावे. जेवणाच्या वेळा ठरवून त्यांना मोकळ्या मैदानात खेळायला न्यावे. यावेळी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. पालकांनी लहान मुलांसोबत इनडोअर गेम खेळण्यात वेळ देणे अपेक्षित आहे. यासह हिरव्या पालेभाज्या व कडधान्य देण्यावरही भर देणे आवश्यक आहे.
बॉक्स
मुले टीव्ही, मोबाइल सोडतच नाहीत
कोट बॉक्स
ऑनलाइन शिक्षणप्रणालीमुळे मोबाइल एक अविभाज्य घटक बनले आहे. जेवणापासून ते रात्री झोपेपर्यंत मुलांना टीव्ही किंवा मोबाइल हवा असतो. हीच बाब अत्यंत धोकादायक आहे.
- इंदिरा सव्वालाखे, पालक
कोट बॉक्स
शाळा बंद असल्याने घरामध्ये मुले बसून असतात. यामुळे मुले बसून असतात. त्यामुळे त्यांच्यामध्ये स्थुलता वाढत असावी. घरातील कामे सांभाळून त्यांना ऑनलाइन क्लास किंवा टीव्ही पाहण्यासाठी सांगितले जाते. मात्र त्यामुळे त्यांचे आउटडोर गेम्स बंद झाले आहेत.
- कविता दलाल, पालक.
बॉक्स
लहान मुलांचे डॉक्टर म्हणतात..
लहान बालकांमध्ये मोबाइल व टीव्ही पाहण्याचे व्यसन लागले आहे. त्यामुळे टीव्ही व मोबाइल याचा वापर कामापुरता करावा. गत काही दिवसांमध्ये लहान मुलांच्या आरोग्यविषयी पालकांच्या चिंता वाढल्या आहेत. यासाठी पालकांनी कोरोना नियम पाळून बालकांचे संगोपन करावे. सध्याचे बदललेले वातावरण पाहता मुलांच्या आरोग्याकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे. या सोबतच जंकफूड न देता मुलांना संतुलित आहार द्यावा. त्यांच्याकडून दररोज त्यांना झेपेल तितका व्यायाम करून घेण्याची सवय लावावी.
-अमित कावळे, बालरोगतज्ज्ञ, भंडारा