कोरोना अद्याप गेलेला नाही; या पाच चुका पुन्हा केल्यास तिसरी लाट अटळ...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:25 AM2021-06-03T04:25:23+5:302021-06-03T04:25:23+5:30
भंडारा : कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा जीवघेणा अनुभव पाठीशी असतानाही, संचारबंदीत सूट मिळताच पहिल्या लाटेनंतर केलेल्या चुकाच नागरिक पुन्हा ...
भंडारा : कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा जीवघेणा अनुभव पाठीशी असतानाही, संचारबंदीत सूट मिळताच पहिल्या लाटेनंतर केलेल्या चुकाच नागरिक पुन्हा करताना दिसत आहेत. मंगळवारपासून भंडारा शहरासह तालुक्यातील विविध ठिकाणच्या बाजारपेठेत नागरिकांची तुफान गर्दी झाली आहे.
कोरोना संसर्गाची दुसरी लाट आल्यानंतर १३ एप्रिलपासून भंडारा जिल्ह्यात ब्रेक द चेनअंतर्गत संचारबंदी घोषित करण्यात आली. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी ७ ते ११ या वेळेत सुरू होती. मात्र राज्य शासनाने १ जूनपासून ब्रेक द चेनअंतर्गत अंशत: शिथिलता दिली आणि पहिल्याच दिवशी नागरिकांची खरेदीसाठी मोठी गर्दी झाली. सकाळी ८ पासूनच नागरिक रस्त्यावर दिसत होते. मंगळवारी दुसऱ्या दिवशी तर त्याहीपेक्षा भीषण स्थिती होती. रस्त्यावर चालायलाही जागा नाही, एवढी वाहने बाजारपेठेत दिसत होती. प्रत्येक दुकानात ग्राहकांची मोठी गर्दी झाली होती. सर्वसामान्यांसह श्रीमंतही बाजारपेठेत दीड महिन्यानंतर खरेदीचा आनंद लुटताना दिसत होते. मात्र या सर्व प्रकारात कोरोना संसर्गाच्या नियमांचे उल्लंघन होत होते. प्रत्येकजण मास्क लावून असले तरी, फिजिकल डिस्टन्सिंग दिसत नव्हते. नगरपरिषदेच्या पथकासह पोलीसही नागरिकांना वारंवार सूचना देत होते. परंतु दीड महिन्यानंतर खरेदीचा उत्साह एवढा होता की, कुणी ऐकण्याच्या मनस्थितीतच नव्हते. दुपारी २ नंतर मात्र बाजारपेठ बंद झाली आणि रस्त्यावर पुन्हा शुकशुकाट दिसू लागला. खरेदी करा, परंतु कोरोना नियमांचे पालन करा, असे आवाहन पोलीस आणि भंडारा नगरपरिषदेच्यावतीने वारंवार ग्राहकांना करण्यात येत आहे.
अनेकांनी काळजी घेतली नाही, अंगावर आजार काढलेत. ग्रामीण भागात पहिली लाट तेवढी नसल्याने हा भाग गाफील राहिला. कंटेन्मेंट झोन असले तरी, पहिल्या लाटेसारखी अंमलबजावणी नव्हती. पहिली लाट गेल्यानंतर आता कोरोना गेला, असा समज झाला. सभा, संमेलने आणि लग्नसोहळे मोठ्या प्रमाणात आयोजित केले.
पालिकेच्या चार पथकांची करडी नजर
संचारबंदीत शिथिलता दिल्यानंतर बाजारात कोरोना नियमांचे पालन होते की नाही, यावर भंडारा नगरपरिषदेची चार पथके करडी नजर ठेवणार आहेत. दुकानात कोरोना नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी होते की नाही, यावर या पथकाचे लक्ष राहणार आहे. उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई होईल.
दुकाने आणि व्यवस्थापनात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची कोरोना तपासणी करण्यात येईल. त्यात पाॅझिटिव्ह आढळल्यास दुकान बंद ठेवण्याचे निर्देश दिले जातील.
शहरातील बाजारपेठेत २०० लिटर क्षमतेचे हँड सॅनिटायझर नगरपरिषदेच्यावतीने ठेवण्यात येणार असून सॅनिटाईज करूनच दुकानात प्रवेश दिला जाईल.
नियमापेक्षा अधिक काळ दुकाने उघडी ठेवणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल. यासाठी अतिरिक्त नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती नगरपरिषदेने केली आहे.