कोरोना रुग्णसंख्या नीचांकी पातळीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 05:00 AM2021-05-28T05:00:00+5:302021-05-28T05:00:46+5:30
जिल्ह्यात एप्रिल महिन्यात कोरोना संसर्गाचा उद्रेक झाला होता. दरराेज सरासरी १२०० रुग्ण आढळून येत होते. मे महिन्याच्या सुरुवातीपासून रुग्णांची संख्या घटू लागली. परंतु शंभरच्या आसपास रुग्ण आढळून येत होते. गुरुवारी जिल्ह्यात ७५८ व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात भंडारा १९, साकोली ८, लाखनी १ आणि तुमसर व मोहाडी येथे प्रत्येक दोन असे ३२ रुग्ण आढळून आले. गत दोन महिन्यांत ही नीचांकी पातळी आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : कोरोना संसर्गाचा उद्रेक अनुभवलेल्या नागरिकांना गुरुवारी मोठा दिलासा मिळाला. गत दोन महिन्यांनंतर पहिल्यांदाच रुग्णसंख्या नीचांकी पातळीवर आली. गुरुवारी केवळ ३२ पॉझिटिव्ह व्यक्ती आढळून आल्या असून पवनी आणि लाखांदूरमध्ये तर एकाही रुग्णाची नोंद झाली नाही.
जिल्ह्यात एप्रिल महिन्यात कोरोना संसर्गाचा उद्रेक झाला होता. दरराेज सरासरी १२०० रुग्ण आढळून येत होते. मे महिन्याच्या सुरुवातीपासून रुग्णांची संख्या घटू लागली. परंतु शंभरच्या आसपास रुग्ण आढळून येत होते. गुरुवारी जिल्ह्यात ७५८ व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात भंडारा १९, साकोली ८, लाखनी १ आणि तुमसर व मोहाडी येथे प्रत्येक दोन असे ३२ रुग्ण आढळून आले. गत दोन महिन्यांत ही नीचांकी पातळी आहे. गुरुवारी जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट ४.२ पर्यंत खाली आला होता.
गुरुवारी तुमसर तालुक्यातील एका ३० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला, तर ७२ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली. सध्या जिल्ह्यात १०२० ॲक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. गत काही दिवसांपासून रुग्णांची संख्या कमी होत असल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळत आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत तीन लाख ८० हजार ९६९ व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात ५८ हजार ३७६ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळले. त्यापैकी ५६ हजार ३०९ व्यक्ती कोरोनामुक्त झाले, तर १०४७ व्यक्तींचा कोरोनाने बळी गेला. आता रुग्णसंख्या वेगाने कमी होत असून मृत्युसंख्याही नियंत्रणात आली आहे. त्यामुळे सर्वांना दिलासा मिळत आहे.
ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या घटू लागली
जिल्ह्यात ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या घटू लागल्याचे दिसत आहे. एप्रिल महिन्यात १३ हजारापर्यंत ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या गेली होती. मात्र आता रुग्ण संख्या कमी होवून बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढत असल्याने ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या नियंत्रणात आहे. जिल्ह्यात सध्या १०२० ॲक्टिव्ह रुग्ण असून त्यात भंडारा ४०८, मोहाडी ६९, तुमसर ११५, पवनी ७७, लाखनी ८१, साकोली २०५, लाखांदूर ६५ रुग्णांचा समावेश आहे.
मृत्यूदर १.७९ टक्के
- जिल्ह्याचा मृत्यूदर १.७९ टक्के असून सर्वाधिक मृत्यू भंडारा तालुक्यात नोंदविले गेले आहेत. भंडारा तालुक्यात ४८८, मोहाडी ९३, तुमसर ११८, पवनी १०४, लाखनी ९४, साकोली १०१, लाखांदूर ४९ अशा १०४७ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. मृत्यूदर सुरूवातीपासून नियंत्रणात आहे.