भंडारा व लाखनीत आढळले कोरोना पाॅझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:39 AM2021-08-25T04:39:55+5:302021-08-25T04:39:55+5:30
भंडारा : कोरोनामुक्त झालेल्या भंडारा जिल्ह्यात पुन्हा रुग्णसंख्या वाढू लागली आहे. मंगळवारी ४३७ व्यक्तींची चाचणी केल्यानंतर भंडारा आणि लाखनी ...
भंडारा : कोरोनामुक्त झालेल्या भंडारा जिल्ह्यात पुन्हा रुग्णसंख्या वाढू लागली आहे. मंगळवारी ४३७ व्यक्तींची चाचणी केल्यानंतर भंडारा आणि लाखनी तालुक्यात प्रत्येकी एक व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळून आला आहे. त्यामुळे ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या सात झाली आहे.
गत तीन आठवड्यांपूर्वी भंडारा जिल्हा कोरोनामुक्त झाला होता. ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या निरंक होती. मात्र गत आठ दिवसांपासून रुग्णसंख्या वाढायला लागली आहे. मंगळवारी ४३७ व्यक्तींची तपासणी करण्यात आली. त्यात भंडारा आणि लाखनी येथे रुग्ण आढळून आले. तर एका व्यक्तीने कोरोनावर मात केली. सध्या भंडारा तालुक्यात तीन, लाखनी आणि साकोली तालुक्यात प्रत्येकी दोन असे सात ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
कोरोना संसर्ग कमी होताच नागरिकांनी नियमांना बगल देणे सुरू केले आहे. बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. एकीकडे प्रशासन तिसऱ्या लाटेची सूचना देत असताना नागरिक मात्र नियमांचे उल्लंघन करीत आहेत. भंडारा जिल्ह्यात आतापर्यंत ६० हजार ८० व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळून आल्या. त्यापैकी ५८ हजार ९४० व्यक्ती कोरोनामुक्त झाले आहेत. तर ११३३ व्यक्तींचा कोरोनाने बळी घेतला. कोरोना रुग्णांची संख्या कमी असली तरी धोका मात्र कायम आहे.