कोरोनामुळे गुढीपाडव्याची बाजारातील लाखोंची उलाढाल थांबली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:33 AM2021-04-13T04:33:43+5:302021-04-13T04:33:43+5:30
गुढीपाडव्याला मुहूर्त साधत अनेकजण नवीन घर खरेदी, गाडी, दुचाकी, सोने तसेच अन्य कोणतीही नवीन खरेदी अथवा लहान-मोठी कामे ...
गुढीपाडव्याला मुहूर्त साधत अनेकजण नवीन घर खरेदी, गाडी, दुचाकी, सोने तसेच अन्य कोणतीही नवीन खरेदी अथवा लहान-मोठी कामे या दिवशी करतात. मात्र जिल्ह्यासह राज्यात कोरोना संसर्गाची दुसरी लाट आल्याने ब्रेक दि चेन सुरू आहे. त्यामुळे सर्वच जिल्ह्यातील दुकाने शनिवार, रविवारी बंद होती. सोमवारी दुकाने काही प्रमाणात उघडली असली तरीही ग्राहक मात्र फिरकलेच नसल्याचे दिसून आले. ग्राहकांनीदेखील सावध पवित्रा घेतला असल्याचे चित्र आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आल्याने बाजारपेठेत शांतता आहे. दरवर्षी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोन्या-चांदीचे अलंकार, नवीन कपडे, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, मोबाईल, वाहन खरेदी, जमीन खरेदी, घर खरेदी आदी व्यवहारांना प्राधान्य दिले जाते. मात्र यावर्षी कोरोनामुळे अनेक जण घराबाहेर पडत नसल्याचे चित्र आहे. अगदी जीवनावश्यक वस्तू वगळता अन्य खरेदीसाठी ग्राहकांचा उत्साह नसल्याने गुढीपाडव्यानिमित्त अनेक ग्राहक फिरकत नसल्याचे दुकानदारांनी सांगितले.
दरवर्षी दुचाकी-चारचाकी यांची होणारी बुकिंग यावर्षी म्हणावी त्याप्रमाणात झाली नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे अगदी गुढी उभारण्यासाठी लागणाऱ्या साहित्यापासून ते विविध खरेदीसाठी यावर्षी उत्साह ओसरला असल्याचेच चित्र आहे. गुढीसाठी लागणारे बांबू, कडुलिंबाचा पाला, झेंडूची फुले, मिठाई, साडी, बत्ताशे, धूप सर्व पूजेचे साहित्य म्हणावे त्याप्रमाणात विक्री झाली नसल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. यावर्षी अगदी मोजक्याच उपस्थित घरच्याघरी निवडक साहित्याने गुढीपाडवा सण साजरा होत आहे. वर्षानुवर्षांपासूनची असलेली गुढीपाडव्याची परंपरा यावर्षी कोरोनामुळे साध्या पद्धतीनेच साजरा करण्यात येत असल्याचे वयोवृद्ध नागरिकांनी सांगितले.
बॉक्स
सोने-चांदीच्या दरात घट होऊनही ग्राहकांची पाठ
गेल्या काही दिवसापासून सोने-चांदीच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. अगदी ५३ ते ५५ हजार रुपयांवर प्रति तोळा गेलेले सोने आता ४३ हजार रुपयावर आले. असे असताना महिलांनी सोने खरेदीकडे पाठ फिरविली असल्याचे चित्र दिसून आहे. दरवर्षी महिलांमध्ये दिसणारा सोने खरेदीचा उत्साह यावर्षी मात्र दिसत नाही. कोरोना मृतांचा वाढलेला आकडा पाहून अनेकांनी धास्ती घेतली आहे.
कोट
माझ्या बालपणापासून मी कधीही गुढीपाढव्याच्या दिवशी जुने कपडे वापरले नाही. मात्र यावर्षी असलेला कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन अगदी साध्या पद्धतीने बाजारात गर्दी न करता साजरा करणार आहे. इतरांनीही कामाशिवाय घराबाहेर पडू नये.
नागरिक.