कोरोनाने सर्वकाही हिरावले, आता प्रशासनाचा थोडा दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:46 AM2021-06-16T04:46:49+5:302021-06-16T04:46:49+5:30

सालेकसा : कोरोनामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले असून, कुणाला आपला पती गमवावा लागला, तर कुणाला आपले आई-वडील. अनेक ...

Corona took everything away, now a little relief from the administration | कोरोनाने सर्वकाही हिरावले, आता प्रशासनाचा थोडा दिलासा

कोरोनाने सर्वकाही हिरावले, आता प्रशासनाचा थोडा दिलासा

Next

सालेकसा : कोरोनामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले असून, कुणाला आपला पती गमवावा लागला, तर कुणाला आपले आई-वडील. अनेक घरांमध्ये अन्नछत्रसुध्दा हरपले, तर काही मुले कायमची अनाथ झाली. काही नवविवाहितांचा विधवा झाल्यामुळे संसार उद्ध्वस्त झाला आहे. अशात जे गेले ते परत येणे अशक्य आहे; मात्र अशा अनाथांना थोडी मदत आणि थोडा दिलासा मिळणार तर ते स्वत:ला सावरुन पुढचे आयुष्य जगू शकतात. ही बाब लक्षात घेता, जिल्हा प्रशासनाने ‘गृहभेट आपुलकीची’ हा उपक्रम सुरू केला आहे. याअंतर्गत तालुक्यात तहसील कार्यालयाच्यावतीने तालुक्यातील कोरोना पीडित कुटुंब ज्यांच्या घरातून कोणी निघून गेले, अशा कुटुंबांना घरी जाऊन सांत्वन देण्याचे काम केले जात आहे.

तहसीलदार शरद कांबळे व नायब तहसीलदार अरुण भुरे यांच्या नेतृत्वात इतर महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांनी तालुक्यातील ग्राम जांभळ‌ी, मुरुमटोला, लटोरी, बाम्हणी, आमगाव खुर्द व इसना या गावांमधील कुटुंबांना घरी जाऊन भेट दिली. त्यांना शासनाच्या विशेष सहाय योजना, इंदिरा गांधी निराधार योजना, संजय गांधी निराधार योजना, कुटुंब सहाय्य योजना आदी माध्यमातून मिळणारी शासनाची मदत तसेच अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत मिळणारे ३५ किलो धान्य प्राप्त करण्याचा सल्ला दिला. आतापर्यंत तालुक्यात २५ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून, यापैकी अनेक कुटुंबांना आपल्या जगण्याचा आधार हिरवावा लागला आहे. अशावेळी प्रशासनाची गृहभेट दिलासा देणारी ठरत आहे.

रेशनची भेट व योजनांची कारवाई

या भेटीदरम्यान त्या कुटुंबांना मोफत रेशन आणि जीवनावश्यक वस्तू देऊन दिलासा दिला जात आहे. दरम्यान, गरीब, निराधार लोकांना शासनाच्या कोणकोणत्या योजनांचा लाभ देता येईल, याची माहिती देत त्यांच्या घरी प्रत्यक्ष भेटीदरम्यान कागदपत्रांची कारवाई केली जात आहे. यामुळे अशा गरजूंना शासकीय कार्यालयाच्या चकरा मारायची गरज नसून ‘गृहभेट आपुलकीची’ या उपक्रमांतर्गत आता खुद्द प्रशासनच या गरजूंच्या दारी जात असल्याचे दिसत आहे.

Web Title: Corona took everything away, now a little relief from the administration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.