कोरोना लसीकरणात ‘हेल्थ केअर वर्कर’ ठरले अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 05:06 AM2021-02-18T05:06:52+5:302021-02-18T05:06:52+5:30
इंद्रपाल कटकवार भंडारा : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कोविड १९ लसीकरण मोहीम जिल्हाभर सुरू करण्यात आली. यात दुसरी फेरीही ...
इंद्रपाल कटकवार
भंडारा : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कोविड १९ लसीकरण मोहीम जिल्हाभर सुरू करण्यात आली. यात दुसरी फेरीही सुरू झाली असून पहिल्या फेरीत हेल्थकेअर वर्कर कोरोना लस घेण्यात आघाडीवर आहेत.
भंडारा जिल्ह्यात १५ हजार १७० कर्मचाऱ्यांची लसीकरण अंतर्गत नोंदणी करण्यात आली आहे. यात पहिल्या टप्प्यात ८ हजार ७९ अधिकारी व कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली आहे. त्यात सर्वांत आघाडीवर हेल्थकेअर वर्कर असून त्यांची संख्या ७,२९७ इतकी असून त्यापैकी पाच हजार ७५६ वर्कर्सना लस देण्यात आली आहे. जिल्ह्यातील ९८९ आशा वर्कर, २९१ पोलीस कर्मचारी, ३९१ होमगार्ड, कारागृहामधील ३१ कर्मचारी, कोब्रा बटालियन येथील १४० जवान, नगरपालिकेतील ३८८ कर्मचारी, महसूल विभागातील ९५ तर पंचायत राज विभागातील दोन कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली आहे.
दुसऱ्या टप्प्याअंतर्गत ८ हजार ७९ लाभार्थ्यांना लस देण्यात येणार आहे. लसीकरण हे शासकीय सुट्टी व रविवारला वगळून करण्यात येत आहे. लाभार्थ्याला लस दिल्यानंतर दुसरा रोज २८ दिवस पूर्ण झाल्यावर देणे अपेक्षित आहे.
बॉक्स
कोरोना लसीकरणासाठी सर्वच विभागांतील कर्मचारी तत्पर
कोरोना लसीकरणासाठी सर्वच विभागांतील कर्मचारी तत्पर दिसून आले. लसीकरण सुरक्षित असून कोणालाही घाबरण्याचे कारण नाही, असे आधीच राज्य शासनाने सांगितले आहे. याची प्रचितीही मोहिमेत दिसून येत आहे. भंडारा जिल्ह्यात नोंदणी झालेल्या लाभार्थ्यांपैकी कुणीही लस का घेऊ नये, असा सवाल उपस्थित केला नाही. सर्वांनी लसीकरणाबाबत पुढाकार दाखविला आहे. यासाठी जिल्हा आरोग्य विभागाची तत्परता कारणीभूत ठरली. जिल्हाधिकारी यांच्यासह आरोग्य प्रशासनाने टप्प्याटप्याने जनजागृती करण्यावर भर दिला. आता कोविड लसीकरणाचा दुसरा टप्पाही सुरू झाला आहे. यातही सर्वच हिरिरीने सहभाग नोंदवित आहेत.