सिल्लीत ६६० व्यक्तींनी घेतली कोरोना लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:31 AM2021-04-05T04:31:01+5:302021-04-05T04:31:01+5:30
जिल्हा प्रशासनाच्या वतीने कोरोनामुक्त मोहिमेसाठी लसीकरण हाती घेण्यात आले आहे. जिल्ह्यातील १६८ केंद्रांवर कोरोनाची लस दिली जात आहे. जिल्हा ...
जिल्हा प्रशासनाच्या वतीने कोरोनामुक्त मोहिमेसाठी लसीकरण हाती घेण्यात आले आहे. जिल्ह्यातील १६८ केंद्रांवर कोरोनाची लस दिली जात आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, आरोग्यवर्धिनी केंद्र आणि काही खासगी रुग्णालयांतही लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. भंडारा जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून, नागरिकांची बेफिकीर वृत्ती त्याला कारणीभूत आहे. प्रशासनाच्या वतीने विविध निर्बंध लावल्यानंतरही नागरिक नियमांना पायदळी तुडवत आहेत. जिल्हा प्रशासनाने कोरोना लसीकरणासाठी नागरिकांनी यावे यासाठी मोहीम सुरू केली आहे. गावागावांत जनजागृती करून ४५ वर्षांवरील नागरिकांना कोरोना लस घेण्यासाठी आवाहन केले जात आहे. ग्रामीण व शहरी भागात या लसीकरणाला व्यापक प्रतिसाद मिळत आहे. ४५ वर्षांवरील व्यक्तींचे लसीकरण सुरुवातीला ६० वर्षांवरील सर्व व्यक्ती आणि ४५ वर्षांवरील अतिजोखमीचे आजार असलेल्या व्यक्तींना लस दिली जात होती. मात्र १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील सर्वांना लसीकरण मोहिमेला प्रारंभ झाला आहे. याच अनुषंगाने सिल्ली येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र येथे कोरोना लसीकरण मोहीम २४ मार्चपासून सुरू करण्यात आली. यात २४, २५ व २६ तारखेला पहिल्या टप्प्यात ६० च्यावर वयोगटातील आंबाडी, सिरसघाट, अझिमाबाद, सिल्ली, गिरोला व पालगाव येथील तब्बल ४७० महिला-पुरुषांना कोव्हॅक्सिन लस देण्यात आली. नंतर ३१ मार्च, १ एप्रिल व ४ एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यात ४५च्यावर वर्ष वयोगटातील १९० महिला-पुरुषांना कोविशिल्ड लस देण्यात आली. सदर कोरोना लसीकरण मोहिमेत आतापर्यंत ६६० व्यक्तींनी लसीकरणाचा लाभ घेतला.
सदर मोहिमेत डॉ. रेवाकांत गभने, आरोग्यसेविका चंदा झलके, पद्मा घटारे, एम.एम. शेख, एस.एस. चेटुले, आशा वर्कर मीनाक्षी साखरवाडे, संगीता बावनकुळे, शालू क्षीरसागर, दुर्गा भुरे, रंजना बावनकर व शालू उरकुडे आदी कर्मचाऱ्यांनी लसीकरणात सेवा दिली.