ग्रामस्तरावरील कोरोना दक्षता समित्या उरल्या केवळ नावापुरत्याच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:32 AM2021-04-26T04:32:20+5:302021-04-26T04:32:20+5:30
ग्रामीण भागातील ग्रामस्तरीय कोरोना दक्षता समितीपुढे कारवाई कशी करावी, असा मोठा प्रश्न आहे. गावात एखादा कोरोना पॉझिटिव्ह अथवा त्याचे ...
ग्रामीण भागातील ग्रामस्तरीय कोरोना दक्षता समितीपुढे कारवाई कशी करावी, असा मोठा प्रश्न आहे. गावात एखादा कोरोना पॉझिटिव्ह अथवा त्याचे नातेवाईक बाहेर फिरत असल्यास त्याच्यावर कारवाई करण्याची गरज आहे. मात्र, कोणीही दुश्मनी घेण्यास तयार नाही. गावातील राजकारण व प्रत्यक्ष ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी सोबत नसल्याने आपण कोणा कोणाची दुश्मनी घेणार, असा प्रश्न ग्राम समितीत असणाऱ्या इतर पदाधिकाऱ्यांना पडत आहे. आजही कोरोना मृतांचा ग्रामीण भागातील आकडा चिंताजनक दिसत आहे. अनेक ठिकाणी मास्क, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन होताना दिसून येत नाही, ही गंभीर बाब आहे. भंडारा तालुक्यातील काही गावात तर काही चौकात गप्पा मारतानाचे चित्र आहे. सभेच्या बहाण्याने अनेक जण एकत्र येत आहेत. मात्र, या समित्या कारवाई करत नसल्याने या कोरोना दक्षता समितीवरच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
बॉक्स
भंडारा तालुक्यातील अनेक गावे रेडझोनमध्ये
भंडारा तालुक्यातील अनेक गावे रेडझोनमध्ये आली आहेत. त्यामुळे कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भंडारा पंचायत समितीचे बीडीओ यांनी ग्रामसेवकांना मुख्यालयी राहणे बंधनकारक करण्याची गरज आहे. ग्रामीण भागात कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांनी स्वतः होऊन कोरोना चाचणी करण्याची गरज आहे. यासोबतच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार स्वतःला क्वारंटाईन करून घेणे गरजेचे आहे. स्वतःमुळे इतरांचा जीव धोक्यात येणार नाही, यासाठी जोपर्यंत नागरिक पुढाकार घेणार नाहीत तोपर्यंत कोरोना संसर्ग कमी होणार नाही.
बॉक्स
ग्रामीण भागातही हवी कडक कारवाई
शहरी भागात अनेक ठिकाणी पोलीस पथके तसेच नगर परिषद प्रशासनाकडून अनेकदा कारवाया होतात. मात्र, त्या तुलनेत ग्रामीण भागात स्थानिक प्रशासनाकडून योग्य त्या प्रमाणात कारवाया होत नसल्याचे चित्र आहे. यामुळेच नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन होत असल्यानेच किंबहुना शहरापेक्षा जास्त ग्रामीणमध्येच कोरोना संसर्ग वाढत आहे. आता ग्रामीण भागातही कडक कारवाई करण्याची गरज आहे.