कोरोनाग्रस्तांवर अंत्यसंस्कार करणारे कोरोना योद्धे कोरोनापासून कोसो दूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:34 AM2021-03-19T04:34:32+5:302021-03-19T04:34:32+5:30
भंडारा : गतवर्षी एप्रिल महिन्याच्या सुरवातीच्या काळात कोरोनाच्या भीतीने माणसापासून माणूस दुरावला होता. मात्र अशा कठीण परिस्थितीतही २९२ कोरोनाग्रस्तांवर ...
भंडारा : गतवर्षी एप्रिल महिन्याच्या सुरवातीच्या काळात कोरोनाच्या भीतीने माणसापासून माणूस दुरावला होता. मात्र अशा कठीण परिस्थितीतही २९२ कोरोनाग्रस्तांवर अंत्यसंस्कार करून एक सामाजिक बांधिलकीची जबाबदारी नगर परिषदेच्या सात कोरोना योद्ध्यांनी पार पाडली आहे. अचानक आलेल्या या कोरोना संसर्गाने समाजात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
राष्ट्रीय महामार्गावरील कारदा टोलनाक्यापासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या करजखेडा स्थित गिरोला येथील स्मशानभूमीत कोरोनाग्रस्तांचे सरण रचताना नातेवाईक येण्यास धजावत नव्हता. मात्र अशा स्थितीत भंडारा नगर परिषदेचे अभियंता प्रशांत गजभिये यांनी सहकाऱ्यांसोबत स्वतः पीपीई किट घालून अनेकांचे अंत्यविधी पार पाडले. राष्ट्रीय महामार्गावरील कारधा टोलनाक्यापासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या करजखेडास्थित गिरोला येथील कोरोना स्मशानभूमीत कोरोनाग्रस्तांचे सरण रचताना नातेवाईकही येण्यास धजावत नव्हता मात्र अशा स्थितीत नगर परिषदेचे अभियंता प्रशांत गजभिये यांनी सहकाऱ्यांसोबत स्वतः पीपीई किट घालून अनेकांचे अंत्यविधी पार पाडले.
मार्च एप्रिल २०२० चा तो एक काळ असा होता की, जेव्हा कोरोनाबाधित व्यक्ती अगदी दूर अंतरावर असली तरी अनेकांच्या अंगावर काटा उभा राहत होता. स्वत:चे नातेवाईक असो की, शेजारची मंडळी असो, मित्र, मैत्रिण, कार्यालयातील सहकारीच नव्हे तर काही प्रसंगी स्वत:ची मुलेही अंत्यविधीसाठी पुढे आली नाहीत अशी कोरोनाची प्रचंड भीती प्रत्येकाच्याच मनात होती. मात्र अशा कठीण परिस्थितीतही स्वतःच्या सुरक्षेची पुरेपूर काळजी घेत कोरोनाग्रस्तांवर अंत्यसंस्कार करणारी ही माणसं आणि त्यांचे कुटुंबीय आजही कोरोनापासून चार हात लांबच राहिले आहेत. ही अभिमानाची गोष्ट आहे. हेच कोरोना योद्धे आज सर्वांना अरे, कोरोनाला घाबरू नका तर कोरोना संसर्गाची योग्य ती काळजी घ्या असा संदेश देत समाजातील भीती कमी करण्याचे काम करत आहेत.
कोरोनाग्रस्तांवर अंत्यसंस्कार करणारी ही टीम गेल्या वर्षभरापासून प्रचंड मेहनत घेत आहे. यात अभियंता प्रशांत गणवीर, सफाई मुकादम रक्षित दहिवले, सीताराम बांते, सफाई कामगार सीताराम बांते, जसपाल सानेकर,संदीप हुमणे,राकेश वासनिक यांनी कोरोना मृताच्या कुटुंबीयांना धीर देत अत्यंत जोखमीचे असणारे काम पार पाडले आहे. कठीण परिस्थितीत आरोग्य कर्मचाऱ्यांच्या पलीकडे जाऊन ज्यांनी आपल्या कुटुंबाची व स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कोरोनाग्रस्त मृतांवर आपलेपणाने अंत्यसंस्कार केले, त्या कोरोना योद्ध्यांना सलाम.
बॉक्स
१ जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण मृत्यु पावला तेव्हापासून ते आजपर्यंत भंडारा नगर परिषदेचे सात कर्मचारी गेल्या वर्षभरापासून अंत्यसंस्कार करीत आहेत. आतापर्यंत या कर्मचाऱ्यांनी २९२ कोरोनाग्रस्तांवर अंत्यसंस्कार केले आहेत.
यावेळी अनुभव कथन करताना अभियंता गणवीर सफाई मुकादम रक्षित दहिवले व सफाई कर्मचारी सीताराम बांते यांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. साहेब ते दिवस कधीही विसरणार नाही ज्या आईवडिलांनी आयुष्यभर आपल्या संततीसाठी संपत्ती जमवली इतके कष्ट सहन केले मात्र काही प्रसंगी काही मुले आपल्या आईवडिलांना ही अग्नी देण्यास पुढे आली नाहीत. मात्र मुलांनी नाकारले म्हणून काय झाले हे आपल्या वाट्याला आलेले भाग्याचे काम आहे आपण पुण्याचे काम करत आहोत, याची जाणीव ठेवून नगर परिषदेच्या या सात कोरोना योद्ध्यांनी मृतदेह गाडीतून उचलण्यापासून ते सरणावर रचून त्यात अंत्यविधीचा स्वतः शेवटचा विधी पार पाडला.
३ पीपीई कीट घालून फिरणे एवढे सोपे काम नाही मात्र अशा स्थितीत मृताच्या अंगावर काड्या रचणे व त्याला अग्नी देणे या गोष्टी सुरुवातीला सोप्या नव्हत्या आज त्याची सवय झाली आणि आपण एक सामाजिक बांधिलकीतून हे कर्तव्य पार पाडत असल्याचेही यावेळी सांगितले.
कोट
टीम लीडर म्हणून स्वतः सरण रचले आणि सहकाऱ्यांची भीती कमी केली. कधीकधी पाच पाच सहा सहा मृतदेह एका दिवशी यायचे. त्यावेळी मात्र प्रचंड धावपळ व्हायची. मात्र प्रिकॉशन घेऊन एकमेकांना धीर देत काम करतच गेलो. अंत्यसंस्काराची जबाबदारी माझ्यासह अन्य सात सहकाऱ्यांवर आली. त्यावेळी प्रचंड भीती मनात होतीच मात्र हे कर्तव्य आपल्याला पार पाडायचे आहे यासाठी सहकाऱ्यांना पीपीई कीट कशी वापरायची, कोणती काळजी घ्यायची सांगितले. सोबतच शव उचलण्यापासून ते सरणावर रचण्याचे काम केले. काही प्रसंगी मृताचे नातेवाईक जरी जवळ आले नाही तरी स्वतः पुढे होऊन अग्नी देण्याचे काम करत गेलो.
प्रशांत गणवीर, कनिष्ठ अभियंता, नगर परिषद,भंडारा.
कोट
त्या वर्षभराच्या काळात खूप वाईट गोष्टी अनुभवल्या
हे आमच्या भाग्याचे काम होते. आयुष्यभर मुलांसाठी काबाडकष्ट करून अखेरच्या क्षणी अंत्यसंस्कार करायला जेव्हा स्वतःच्या मुलगा पुढे येईना तेव्हा मात्र हमसून हमसून रडायला आले. मात्र तरीही हिंमत न हरता आम्ही स्वतः पुढे होऊन अंत्यविधी करताना कोणतीच उणीव ठेवली नाही. यासाठी खासदार मेंढे, मुख्याधिकारी जाधव, अभियंता गजभिये साहेबांनी खूप मदत केली. यासोबतच नगर परिषदेने पगाराव्यतिरिक्त पाच हजाराचा प्रोत्साहन भत्ता दिला. कोरोनाला कुणाला न घाबरता योग्य ती खबरदारी घेत नागरिकांनी कोरोनाचा सामना करावा
रक्षित दहिवले,
सफाई मुकादम, नगर परिषद, भंडारा.
कोट
असे काम कधीच केले नव्हते
त्यावेळी मनात प्रचंड भीती होती. कोरोना संसर्ग झालाच तर आपले, आपल्या कुटुंबाचे काय होईल असे विचार यायचे. मात्र अभियंता गणवीर साहेबांनी त्यावेळी प्रोत्साहन दिले. सरकारी हॉस्पिटलच्या लोकांनीही खूप मार्गदर्शन केले. डेडबॉडी उचलण्यापासून ते प्रत्येक गोष्टीची कशी काळजी घ्यायची याबाबत सांगितले. नातेवाईकांनी नाकारले मात्र त्या कोरोनाग्रस्त मृतांचा आपण अंत्यसंस्कार करू शकलो याचा सार्थ अभिमान वाटत आहे.
सीताराम बांते, सफाई कामगार नगर परिषद, भंडारा