Coronavirus in Bhandara ; एचआरसीटी स्कोर २० असताना तरुणाची कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 09:58 AM2021-04-27T09:58:28+5:302021-04-27T10:00:13+5:30

Coronavirus in Bhandara एका तरुणाचा एचआरसीटी स्कोर २० असतानाही केवळ इच्छाशक्तीच्या जोरावर त्याने कोरोनावर यशस्वी मात केली आणि तीही रेमडेसिविर इंजेक्शन न घेता. पवनी तालुक्यातील मोखाराचा त्र्यंबकेश्वर प्रदीप गिऱ्हेपुंजे याने कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

Coronavirus in Bhandara; When the HRCT score was 20, the youth defeated Corona | Coronavirus in Bhandara ; एचआरसीटी स्कोर २० असताना तरुणाची कोरोनावर मात

Coronavirus in Bhandara ; एचआरसीटी स्कोर २० असताना तरुणाची कोरोनावर मात

Next
ठळक मुद्दे भंडारा  जिल्ह्यातील जिगरबाज तरुण रेमडेसिविर इंजेक्शन न घेता योग्य उपचार

लोकमत न्यूज नेटवर्क

भंडारा : कोरोना झाला असे माहीत झाले की अवसान गळून बसणारे अनेकजण आहेत. रुग्ण आणि घरातील मंडळीही भयभीत होतात. मात्र, एका तरुणाचा एचआरसीटी स्कोर २० असतानाही केवळ इच्छाशक्तीच्या जोरावर त्याने कोरोनावर यशस्वी मात केली आणि तीही रेमडेसिविर इंजेक्शन न घेता. पवनी तालुक्यातील मोखाराचा त्र्यंबकेश्वर प्रदीप गिऱ्हेपुंजे याने कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

कोरोना संसर्गाने सर्वत्र थैमान घातले आहे. भंडारा जिल्ह्यातही कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोना झाला की आपले काय होणार, असा प्रश्न सतावतो. त्यातून मग मानसिक धक्का बसतो. जवळचे नातेवाईकही मानसिक आधार न देता त्याच्यापासून दूर जातात आणि कोरोनाबाधिताची मानसिक स्थिती खालावत जाते, असा काहीसा सर्वत्र अनुभव आहे. परंतु, एका कोरोना पाॅझिटिव्ह तरुणाने केवळ इच्छाशक्तीच्या जोरावर आणि संकटावर मात करत कोरोनाला हरवले. त्र्यंबकेश्वर गिऱ्हेपुंजे यांना सुरुवातीला बारीक ताप आला. त्यांनी रक्ताची चाचणी केली. तेव्हा टायफाईड असल्याचे निदर्शनास आले. औषधे सुरु केली परंतु चार दिवसानंतर पुन्हा तपासणीसाठी त्यांना पाठवले. त्यानंतर एचआरसीटी चेस्ट काढायला नागपूरला पाठवले. त्यावेळी त्यांचा स्कोर २५मध्ये २० इतका आढळला. कुणी दुसरा तिसरा असता तर तेथेच हिंमत खचला असता. परंतु, मोठ्या हिमतीने त्र्यंबकेश्वरने या परिस्थितीचा सामना करण्याचे मनाशी ठरवले. त्यांना उपचारासाठी भंडारा येथे आणण्यात आले. पण बेड न मिळाल्याने नागपूरला नेण्यात आले. तेथेही बेड मिळाला नाही म्हणून परत भंडाऱ्याच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. २५मध्ये २० स्कोर असलेला रुग्ण वाचणे कठीण असते. परंतु, त्र्यंबकेश्वरने हिंमत सोडली नाही. नियमित प्राणायाम व डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार सुरु ठेवला. सलग पाच दिवस त्याने डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधे घेतली. विशेष म्हणजे या काळात त्याला रेमडेसिविर इंजेक्शनही देण्यात आले नाही. अवघ्या चार दिवसात त्याचा एचआरसीटी स्कोर २०वरुन १५वर आला. त्यानंतर तो कमी होत गेला. आता ठणठणीत बरा झाल्यानंतर त्याला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

एका कोरोना योद्ध्यासारखी त्याने या संकटावर मात केली. मानसिक संतूलन ढळू न देता त्याने आलेल्या परिस्थितीचा सामना केला. डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घेतला. त्यामुळेच आज तो मोठ्या आत्मविश्वासाने कोरोना रुग्णांना धीर देत आहे.

अन् आजीने सोडला प्राण

त्र्यंबकेश्वर याला कोरोना झाल्याचे माहीत होताच आजीने हिंमत हरली. लाडक्या नातवाचे काय होईल, अशी चिंता तिला सतावू लागली. यातच आजी कलाबाई लक्ष्मण गिऱ्हेपुंजे यांचा मृत्यू झाला. आपल्या आजीचा मृत्यू झाल्याचे त्र्यंबकेश्वरला रुग्णालयात माहीत झाले. परंतु, अशा विपरित परिस्थितीही त्याने हिंमत हरली नाही.

समाजसेवेचा वसा

त्र्यंबकेश्वर गिऱ्हेपुंजे याला सुरुवातीपासूनच समाजसेवेची आवड आहे. गतवर्षी पहिल्या लाॅकडाऊनमध्ये त्याने परिसरातील नागरिकांना २,५०० मास्कचे वितरण केले होते. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी तो अनेकांना मार्गदर्शनही करत असतो. मात्र, त्यालाच कोरोनाची बाधा झाली. परंतु, त्यावरही त्याने मात केली.

Web Title: Coronavirus in Bhandara; When the HRCT score was 20, the youth defeated Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.