नगरसेवकाचा खून, कातडे तस्करीने गाजले वर्ष
By admin | Published: December 28, 2015 12:52 AM2015-12-28T00:52:36+5:302015-12-28T00:52:36+5:30
तुमसर तालुक्यात २०१५ हे सरते वर्ष नगरसेवक खून प्रकरण, आंतरराष्ट्रीय वाघ तस्कराची तुमसर तालुक्यातील जंगलात वनअधिकाऱ्यांनी मोका चौकशीने हे वर्ष गाजले.
मोहन भोयर तुमसर
तुमसर तालुक्यात २०१५ हे सरते वर्ष नगरसेवक खून प्रकरण, आंतरराष्ट्रीय वाघ तस्कराची तुमसर तालुक्यातील जंगलात वनअधिकाऱ्यांनी मोका चौकशीने हे वर्ष गाजले. एरव्ही शांत असलेल्या तुमसर तालुक्यात जुलै महिन्यात झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीने राजकीय वातावरण ढवळून निघाले.
१२ आॅगस्ट रोजी नगरसेवक प्रशांत उके यांच्यावर देशी कट्यातून मारेकऱ्यांनी हा हल्ला केला होता. त्यात ते गंभीररित्या जखमी झाले होते. नागपुरात उपचारादरम्यान २० दिवसाच्या मृत्यूशी झुंजीनंतर त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणातील सहा आरोपींना तुमसर पोलिसांनी अटक केली. सरत्या वर्षात तुमसर शहरात तीन खून झाले. मंगलमूर्ती सराफा दुकानात १६ लाखांचे सोने चोरीला गेले. तुमसर पोलीस ठाण्यांतर्गत २८ चोरीच्या घटना घडल्या. आठ मोठे अपघात घडले आहे.
आंतरराष्ट्रीय वाघ तस्कर कुट्टू पारधी याने लेंडेझरी जंगलात वाघाची केल्याप्रकरणी दिल्ली व मुंबई येथील वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे एक पथक लेंडेझरी जंगलात मौका चौकशीकरीता त्याला सोबत घेऊन आले होते.
आंबागड (गायमुख) येथे दसऱ्याच्या दिवशी तीन शालेय विद्यार्थ्यांचा ट्रॅक्टर पलटल्याने सुनिल वाढीवे, राजकुमार टेकाम व सुनिता ठाकरे यांचा मृत्यू झाला होता. गोबरवाही पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या डोंगरी (बुज) येथे राष्ट्रीयकृत बँक फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न झाला होता.
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीकरीता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तालुक्यातील ग्रामीण भागात दौरे केले. पंचायत समितीवर भाजप-शिवसेनेने कब्जा केला तर जिल्हा परिषदेत राका ८, भाजप १, अपक्ष १ निवडून आले तर काँग्रेसला खातेसुध्दा उघडता आले नाही. या निवडणूकीने राजकीय वातावरण ढवळून निघाले.
खासदार नाना पटोले यांनी सांसद आदर्श ग्राम म्हणून तालुक्यातील बघेडा गावाची निवड केली. आमदार आदर्श गाव योजनेत विधानपरिषद सदस्य प्रा. अनिल सोले यांनी रोंघा गावाची निवड केली.
बहुप्रतिक्षीत बावनथडी आंतरराज्यीय प्रकल्पाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १२० कोटींचा निधी देण्याची घोषणा केली. ‘स्वच्छ-सुंदर तुमसर’ संकल्पनेंतर्गत नगराध्यक्ष अभिषेक कारेमोरे यांनी एलईडी लाईट, सीसीटीव्ही कॅमेरे हे येणारे नवीन वर्षाची चाहुल सुखदायक ठरली आहे.
तुमसर रोड हे मुंबई-हावडा रेल्वे मार्गावर असलेले रेल्वे जंक्शन आहे. या रेल्वे स्थानकावर शेकडो रेल्वे प्रवाशांकडून दंड वसूल करण्यात आला. तुमसर रोड येथे रेल्वे उडाणपूलाच्या कामाला सुरुवात झाली. कृषी उत्पन बाजार समितीचे विक्रमी धानाची आवक झाली.