‘त्या’ नगरसेवकाची इंदूरवारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2018 09:21 PM2018-08-24T21:21:01+5:302018-08-24T21:21:21+5:30
बेरोजगार तरुणांना नोकरीचे आमिष दाखवून लाखो रुपयांनी गंडविणारा तुमसर येथील नगरसेवक श्याम धुर्वे विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे. त्यानंतर शहरातून पसार होत इंदूर शहराची पाहणी करण्याकरिता पालिका पदाधिकाऱ्यांसह इंदूरवारी करीत असल्याचे फोटो व्हायरल झाले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : बेरोजगार तरुणांना नोकरीचे आमिष दाखवून लाखो रुपयांनी गंडविणारा तुमसर येथील नगरसेवक श्याम धुर्वे विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे. त्यानंतर शहरातून पसार होत इंदूर शहराची पाहणी करण्याकरिता पालिका पदाधिकाऱ्यांसह इंदूरवारी करीत असल्याचे फोटो व्हायरल झाले आहेत. याबाबत पोलिसांशी चर्चा केली असता त्यांनी कमालीचे मौन बाळगून उडवाउडवीचे उत्तर देत आहेत.
अनेक बेरोजगार तरुणांना कृषी, पणन, जलसंपदा, रेल्वे यासह शासनाच्या अन्य विभागात नोकरी लावून देतो असे आमिष दाखवून नगरसेवक श्याम धुर्वे याने बेरोजगार तरुणाकडे लाखो रुपये घेतले. तर काहींना खोटे नियुक्ती पत्रही दिले होते. दरम्यान आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच दि.१३ आॅगस्ट रोजी तुमसर पोलिसात फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला. त्यादिवशी पासून नगरसेवक श्याम धुर्वे शहरातून पसार झाले आहेत. श्याम धुर्वे हे भाजपा समर्थीत पक्षाचे आताचे नगरसेवक असून ते पूर्वीचे भाजपाचेच नगरसेवक होते. केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार आहे. त्यामुळे आज ११ दिवसांचा कालावधी लोटला तरी पोलिसांनी त्या नगरसेवकास पकडून साधी विचारपूसही केली नाही की कोणते पुरावे गोळा केले नाही. या ऐवजी एखादा सर्वसामान्य व्यक्ती किंवा विरोधी पक्षाचा कार्यकर्ता असता तर पोलिसांनी जीवाचे रान करून त्याला तुरुंगात डांबले असते. त्यामुळे पोलिसांच्या कार्यप्रणालीवर नाराजी दाखवित काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस तात्काळ अटक करण्याकरिता निवेदन दिले आहे. मात्र पोलिसांना धुर्वेचा ठावठिकाणा माहित नसल्याचे त्यांच्याकरवी सांगितले जात असतानाच स्वच्छ भारत मिशन अंतर्गत तुमसर शहर स्वच्छ व स्मार्ट कसे करता येईल. या संदर्भात तुमसर नगरपालिका नगरसेवकांचे शिष्टमंडळ इंदूर शहराची पाहणी करण्याकरिता दोन दिवसापूर्वी गेले. त्या शिष्टमंडळात नगरसेवक श्याम धुर्वे याचाही समावेश असल्याचे बोलके छायाचित्र व्हायरल झाले आहे. त्यामुळे या पुढे तुमसर पोलीस कोणती कारवाई करतात याकडे तुमसरकरांचे लक्ष लागून आहे.