उत्पन्नापेक्षा कापणी-मळणीचा खर्च अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2020 05:00 AM2020-10-31T05:00:00+5:302020-10-31T05:00:16+5:30

भंडारा प्रमुख धान उत्पादक जिल्हा आहे. साधारणत: एक लाख ६० हजार हेक्टरवर यंदा धानाची लागवड करण्यात आली. निसर्गाचा मारा झेलत धान बहरला. मात्र ऐन कापणीच्या वेळेस धानावर तुडतुड्याने आक्रमन केले. अख्खे शेत तुडतुड्याने फस्त केले. महागडी औषधी फवारूनही कीड नियंत्रणात आली नाही. आता सर्वत्र कापणीचा आणि मळणीचा हंगाम सुरू आहे. मात्र उत्पन्नापेक्षा कापणी आणि मळणीचाच खर्च अधिक होत असल्याचे दिसत आहे.

The cost of harvesting is higher than the cost of harvesting | उत्पन्नापेक्षा कापणी-मळणीचा खर्च अधिक

उत्पन्नापेक्षा कापणी-मळणीचा खर्च अधिक

googlenewsNext
ठळक मुद्देशेतकरी हवालदिल : चार एकरात पाच ते सहा पोते धान, तुडतुड्याचा प्रकोप, उसणवारी अन् बँकांचे कर्ज फेडायचे कसे

ज्ञानेश्वर मुंदे Ü 
लाेकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : निसर्गाचा अवकृपेचा सामना करणाऱ्या धान उत्पादकांना यंदा तुडतुड्याने उध्वस्त केले आहे. संपूर्ण शेतशिवार तुडतुड्याने फस्त केले असून आता उत्पन्नापेक्षा कापणी मळणीचाच खर्च अधिक होत आहे. परिणामी काही शेतकऱ्यांनी चक्क उभा धान पेटवून दिला तर काही मोठ्या हिंमतीने धानाची मळणी करताना दिसत आहे. मोहाडी तालुक्यातील काही गावात तर चार एकरात पाच ते सहा पोते धान होत असल्याचे वास्तव आहे. या सर्व प्रकाराने शेतकरी देशोधडीला लागत आहे.
भंडारा प्रमुख धान उत्पादक जिल्हा आहे. साधारणत: एक लाख ६० हजार हेक्टरवर यंदा धानाची लागवड करण्यात आली. निसर्गाचा मारा झेलत धान बहरला. मात्र ऐन कापणीच्या वेळेस धानावर तुडतुड्याने आक्रमन केले. अख्खे शेत तुडतुड्याने फस्त केले. महागडी औषधी फवारूनही कीड नियंत्रणात आली नाही. आता सर्वत्र कापणीचा आणि मळणीचा हंगाम सुरू आहे. मात्र उत्पन्नापेक्षा कापणी आणि मळणीचाच खर्च अधिक होत असल्याचे दिसत आहे. मशागत, बियाणे, रोवणी, फवारणी, कापणी, बांधणी, मळणी यावर साधारणत: २२ हजार रूपये खर्च होतो. २५ ते ३० पोती धान अपेक्षित असतो. 
मात्र यावर्षी खर्च आणि उत्पन्नाचे गणित जुळताना दिसत नाही. सध्या कापणीसाठी एकरी दोन ते तीन हजार रुपये, बांधणीसाठी १५०० रुपये आणि मळणीसाठी ९० रुपये एकरी खर्च होत आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांच्या हातात एकरी पाच ते दहा बोरे पोतेच येत असल्याचे चित्र जिल्ह्यात दिसून येत आहे.
मोहाडी तालुक्याला सर्वाधिक तुडतुड्याचा फटका बसला. कापणी आणि मळणीचाही खर्च निघत नसल्याने काही शेतकऱ्यांनी आता चक्क उभा धान पेटवून दिला आहे. मोहाडी तालुक्यातील वडेगाव येथील शेतकरी ईश्वर माटे यांनी चक्क आपल्या अडीच एकर शेतातील धानाला आग लावून दिली. अशीच अवस्था इतरही शेतकऱ्यांची आहे. मोहाडी तालुक्यातील वडेगाव येथील शेतकरी बाळकृष्ण पगारवार, देविदास मते, दुर्गाप्रसाद मते, मनोहर निंबार्ते, किशोर सपाटे म्हणाले, तुडतुड्याने आम्हाला उध्वस्त केले आहे. धानातून काही हाती येत नाही. संपूर्ण वर्ष कसे काढावे, असा प्रश्न आहे. आधिच कोरोनामुळे आर्थिक स्थिती खालावली अशा स्थितीत जगायचे कसे, असा प्रश्न आहे. शासनाने तात्काळ तुटतुड्यामुळे उध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी होत आहे. सध्या तरी कोणत्याच हालचाली दिसत नाही.

चार एकरात पाच पोतेही धान नाही
मोहाडी तालुक्यातील शिवनी येथील शेतकरी युगल सराटे यांचे शेत तुडतुड्याने उध्वस्त केले. आता त्यांच्या शेतात मळणी सुरू आहे. चार एकरात पाच ते सहा पोते धान होण्याचीही शाश्वती नाही, असे युगल सराटे यांनी सांगितले. शेतात केवळ तणस असून धानाची मळणी करावी की नाही, असा प्रश्न माझ्यासोबत अनेक शेतकऱ्यांना पडला असल्याचे त्यांनी सांगितले. वर्षभर मेहनत करून हाती काहीच उरत नसेल तर जगायचे कसे, असा सवाल आंधळगावचे भोजराम शेंडे यांनी केला.
धान उध्वस्त, सांगा जगायचे कसे
पिकासाठी शेतकऱ्यांनी अतोनात मेहनत घ्यायची, रात्रीचा दिवस करायचा, घाम गाळायचा आणि त्याचे उत्पन्न शेतकऱ्यांना शून्य मिळत असेल तर जगायचे कसे, असा बिकट प्रश्न धान उत्पादक शेतकऱ्यांना पडला आहे. शेतकरी धान पिकाकडे मोठ्या आशेने पाहतात. परंतु निसर्गाची वक्रदृष्टी आणि कीडींच्या आक्रमानाने धान पीक उध्वस्त झाले. धान मळणही करणे शेतकऱ्यांना परवडत नाही. एकीकडे आधारभूत धान खरेदी सुरू झाली. परंतु धान अल्प प्रमाणात येत आहे. अनेक शेतकरी आता हा धान रोखीने व्यापाऱ्यांना विकूण दिवाळी सण साजरा करण्याच्या मनस्थितीत दिसत आहे.

निसर्गार्चा प्रकोप कुणी रोखू शकत नाही. यंदा धान पिकाला महापुराचा फटका बसला. यातून शेतकरी सावरत नाही. तोच धानावर तुडतुड्याचे आक्रमण झाले. अनेक शेतकरी हतबल दिसत आहे. मात्र नैसर्गीक संकटाला घाबरून न जाता शेतकऱ्यांनी अशा परिस्थितीचा हिम्मतीने सामना करावा. तुडतुड्यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचा प्रश्न आपण अधिवेशनात मांडून मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू.
-राजू कारेमोरे, आमदार.

Web Title: The cost of harvesting is higher than the cost of harvesting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती