गणेश भवन इमारत पाडण्यास न्यायालयाची मनाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:38 AM2021-09-25T04:38:44+5:302021-09-25T04:38:44+5:30
तुमसर येथे बोसनगरात गणेश भवन इमारत असून येथे ११ दुकानदार व जनता कनिष्ठ महाविद्यालय गत ३५ वर्षांपासून भरत आहे. ...
तुमसर येथे बोसनगरात गणेश भवन इमारत असून येथे ११ दुकानदार व जनता कनिष्ठ महाविद्यालय गत ३५ वर्षांपासून भरत आहे. उपविभागीय अधिकारी यांनी शुक्रवारी गणेश भवन इमारत पाडण्याचे आदेश दिले होते. आदेशाची प्रत दुकानदार यांना गुरुवारी दुपारी एक ते दोनच्या सुमारास मिळाली. आदेशाच्या विरुद्ध गणेश भवन इमारतीमधील दुकानदार राकेश भेलावे यांच्यासह इतर दहा दुकानदारांनी तुमसर येथील दिवाणी न्यायालयात याचिका दाखल केली. याचिकेत गणेश भवन इमारतीत ११ दुकानदार व जनता कनिष्ठ महाविद्यालय मागील ३५ ते ४० वर्षांपासून भरत आहे. गणेश भवन इमारत पाडल्यास येथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊन शाळा कुठे भरवावी, असा प्रश्न उपस्थित होईल. त्यासोबतच ११ दुकानदारांचा संसार उघड्यावर येऊन त्यांच्यावर उपासमारीची वेळ येईल, असे सांगून गणेश भवन इमारत मजबूत असून पडण्याच्या कोणताच धोका नाही, याची हमी अकरा दुकानदारांनी आम्ही घेतो असं न्यायालयाला सांगितले. एसडीओंनी दिलेला आदेश हा अन्यायकारक असल्याचे याचिकेत म्हटले.
यावर न्यायमूर्ती के. वाय. बोरकर यांनी केवळ वीस तासांत इमारत सोडण्याचे आदेश कसे काय दिले यावर त्यांनी कडक ताशेरे ओढले. या प्रकरणाची पुढील सुनावणी २८ सप्टेंबर रोजी ठेवण्यात आली आहे. याचिकाकर्त्यांच्या वतीने ज्येष्ठ ॲड. दिलीप भोयर, ॲड. दिपक रावलानी यांनी बाजू मांडली.