बांतेला १६ पर्यंत न्यायालयीन कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 10:56 PM2018-05-11T22:56:36+5:302018-05-11T22:56:36+5:30
लाखनी येथील ग्रेस लॅण्ड मंगल कार्यालयासमोर एका ट्रकने महामार्गावरील बॅरीकेटस् तोडून पाच जणांचा बळी घेतला होता. या अपघातानंतर संतप्त जमावाने रास्ता रोखण्याचा प्रयत्न केला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : लाखनी येथील ग्रेस लॅण्ड मंगल कार्यालयासमोर एका ट्रकने महामार्गावरील बॅरीकेटस् तोडून पाच जणांचा बळी घेतला होता. या अपघातानंतर संतप्त जमावाने रास्ता रोखण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे कामात अडथळा आणल्याप्रकरणी पोलिसांनी १५ जणांविरुध्द गुन्हे नोंदवून सात जणांना अटक केली. यात भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष राजेश बांते यांचा समावेश असून त्यांची १६ मेपर्यत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
३० एप्रिल रोजी एका अनियंत्रित ट्रकने पाच जणांचे जीव घेतले. यात सात जण गंभीररित्या जखमी झाले होते. त्यानंतर संतप्त जमावाने ट्रक चालकाला बाहेर काढून मारहाण केली. घटनेनंतर वाहतूक ठप्प केली होती. महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलीस प्रयत्न करीत असताना जमावाने विरोध केल्यामुळे सात जणांना अटक करून इतर १५ जणांविरुध्द गुन्हे दाखल केले. यात राजेश बांते यांचाही समावेश होता. प्रकृती अस्वस्थामुळे त्यांना लाखनी, भंडारा व नागपूर येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले. रूग्णालयातून सुटी होताच पोलिसांनी बांतेंना गुरुवारला लाखनी दिवाणी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १६ मेपर्यत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.