नरेंद्र भोंडेकर यांच्याविरुध्द आरोपपत्र दाखल न करण्याचे कोर्टाचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:24 AM2021-06-11T04:24:41+5:302021-06-11T04:24:41+5:30
भंडारा : महर्षी विद्यामंदिर बेला प्रकरणात आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्याविरुध्द आरोपपत्र दाखल करण्यात येऊ नये, असे आदेश मुंबई उच्च ...
भंडारा : महर्षी विद्यामंदिर बेला प्रकरणात आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्याविरुध्द आरोपपत्र दाखल करण्यात येऊ नये, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले आहेत. तपास अधिकाऱ्याला तपासाचे काम नियमित सुरू ठेवता येईल, मात्र न्यायालयाच्या पूर्वपरवानगीशिवाय आ. नरेंद्र भोंडेकर यांच्याविरुध्द आरोपपत्र दाखल करण्यात येऊ नये, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
महर्षी विद्यामंदिर बेला येथे लॉकडाऊन काळातही पालकांकडे शुल्कासाठी तगादा लावला जात होता. जे विद्यार्थी शुल्क (फी) भरणार नाहीत त्यांना ऑनलाईन क्लासेसमधून ‘रिमूव्ह’ केले जात होते. विद्यार्थी व पालकांना धमक्या दिल्या जात होत्या. यासंबंधीची अनेक पालकांनी आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्याकडे तक्रार केल्यानंतर ४ जानेवारीला महर्षी विद्या मंदिर बेला येथे याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्याविरुध्द शाळा प्राचार्य व शिक्षकांनी अरेरावी करीत खोटे गुन्हे दाखल केले होते.
जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांनी सुध्दा सत्यता पडताळून घेतल्याशिवाय गुन्हे दाखल करण्यास जवाहरनगर ठाणेदारांना आदेश दिले होते. या प्रकरणाची सत्यता पडताळल्याशिवाय आरोपपत्र दाखल करू नये, असे अपील आमदार भोंडेकर यांच्यावतीने दाखल करण्यात आले होते. ॲड. पी. एस. तिवारी यांनी न्यायालयासमक्ष ही बाब पटवून दिल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ८ जून रोजी हा आदेश दिला आहे.