लाखनीत ६० खाटांचे कोविड केअर युनिट सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:32 AM2021-04-19T04:32:35+5:302021-04-19T04:32:35+5:30
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने शहरासह ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य शासनाने १४ एप्रिलच्या ...
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने शहरासह ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य शासनाने १४ एप्रिलच्या रात्री ८ वाजल्यापासून लॉकडाऊन घोषित केला असला तरी रुग्णसंख्या सातत्याने वाढत आहे. तालुक्यातील २० गावे ‘प्रतिबंधित क्षेत्र’ घोषित करून गावाचा परिसर कन्टेन्ट झोन क्षेत्र घोषित करण्यात आला आहे. १५० घरे मायक्रो प्रतिबंधित करण्यात आली असली तरी मनुष्यबळाअभावी आवश्यक त्या उपाययोजना केल्या गेल्या नसल्यामुळे संशयित कोरोना रुग्णांच्या गावात मुक्तसंचार सुरू आहे. त्यामुळे प्रशासनाच्यावतीने उपाययोजना सुरू असल्या तरी त्या अपुऱ्या पडत आहेत. तालुक्यात दारिद्र्यरेषेखालील गरीब कुटुंबे आणि भूमिहीन शेतमजूर कुटुंबीयांची संख्या अधिक असल्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती हालाखीची आहे. त्यामुळे संक्रमित होऊनही ते इतरत्र उपचार घेऊ शकत नाहीत. अशा कुटुंबीयांची तालुक्यातच उपचारांची सोय व्हावी याकरिता आपत्ती व्यवस्थापन व आरोग्य विभागाच्या वतीने समर्थ महाविद्यालयाच्या भगिनी निवेदिता वसतिगृहात ६० खाटांचे कोविड केअर युनिट सुरू करण्यात आले आहे.
बॉक्स
२० दिवसांत १५० शिबिरे
तालुक्यात २० दिवसांत विविध गावांत आरोग्य विभागाच्या वतीने आशा स्वयंसेविका, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविकांच्या सहकार्याने १५० तपासणी शिबिरे लावण्यात आली असून त्यामध्ये २२९२ रुग्ण संक्रमित आढळले आहेत. त्यापैकी ९४० सद्य:स्थितीत ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आजपर्यंत तालुक्यातील २६ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.
तालुक्यातील २० कंटेनमेंट झोन घोषित
तालुक्यातील २० गावे कंटेनमेंट झोनमध्ये समाविष्ट करण्यात आली असून त्यात किन्ही, सिपेवाडा, गराडा, चिखलाबोडी, मासलमेटा, आलेसूर, दिघोरी, पोहरा , बोरगाव, घोडेझरी, लाखोरी, मचारणा, सोमलवाडा, मेंढा, नान्होरी, वाकल, चिचटोला, पिंपळगाव ,सालेभाटा, मोरगाव आदी गावांचा समावेश आहे.