लसीच्या साहाय्यानेच जिंकता येणार कोविड युद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:44 AM2021-04-30T04:44:44+5:302021-04-30T04:44:44+5:30
याबाबत आयएमएचे जिल्हाध्यक्ष डॉ. नितीन तुरसकर म्हणाले, लसीकरणाबाबत बरेच गैरसमज नागरिकांच्या मनात आहेत. लस घेतल्यामुळे पॉझिटिव्ह आलो असेही काही ...
याबाबत आयएमएचे जिल्हाध्यक्ष डॉ. नितीन तुरसकर म्हणाले, लसीकरणाबाबत बरेच गैरसमज नागरिकांच्या मनात आहेत. लस घेतल्यामुळे पॉझिटिव्ह आलो असेही काही जण म्हणतात. ही बाब तथ्यहीन आहे. लसीमुळे हलकासा ताप येतो मात्र पॉझिटिव्ह येणाचे कारण सहव्याधी असणार आम्ही डॉक्टर कोरोना रुग्णांवर नियमित उपचार करतो. अतिशय जोखीम बाळगून डॉक्टरांना रुग्णावर उपचार करावे लागतात. मी स्वत: लस घेतली आहे आणि आजही ठणठणीत बरा आहे. त्याचे एकमेव कारण लस आहे. लस घेणाऱ्या व्यक्तीला कोरोना होऊ शकतो, मात्र मृत्यू होणार नाही. तेव्हा लसीचे महत्त्व ओळखा व आपले जीवन सुरक्षित करा.
· डॉ. शिल्पा जयस्वाल म्हणाल्या, कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर नियमित उपचार करताना आपली सुरक्षा काय? असा प्रश्न जेव्हा आम्हा डॉक्टरांच्या मनात येतो तेव्हा लसीकरण हेच एकमेव उत्तर असते आणि म्हणून सर्वप्रथम लस घेऊन मी स्वत:चे जीवन सुरक्षित केले व आता कोरोना रुग्णांवर निश्चिंतपणे उपचार करत आहे. लस घेतल्यानंतर कोरोनाची लागण झाली तरी लसीमुळे शरीरात तयार झालेल्या ॲन्टिबॉडी तुम्हाला पूर्णपणे सुरक्षित ठेवतात. लस अवश्य घ्या. ‘लस’ तुम्हाला प्रतिकार शक्ती प्रदान करेल.
· डॉ. रोहित वाघमारे म्हणाले, कोरोना विषाणूचा संसर्ग हा तीव्रतेने वाढू द्यायचा नसेल तर लसीकरण अत्यंत गरजेचे आहे. लस घेतल्यानंतर कोरोना फुफ्फुसापर्यंत पोहचण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. कोरोनाला हरविण्यासाठी आपल्याकडील एकमेव शस्त्र म्हणजे लस आहे. लसीबाबत आपल्या मनात असलेले गैरसमज तात्काळ दूर करा. दोन्ही लसी सुरक्षित असून मी स्वत: लस घेतलेली आहे. लस घेतल्यानंतर काही त्रास जाणवल्यास घाबरून न जाता डॉक्टरांचा सल्ला घ्या व लसीबाबत अफवा पसरवू नका. लसच तुम्हाला कोरोना पासून वाचविणार आहे, हे कायम लक्षात असू द्या.
· डॉ. गोपाल सार्वे म्हणाले, मी स्वत: लस घेतली आहे. ज्या ठिकाणी संसर्ग जास्त असतो अशा वातावरणात आम्ही काम करतो. लस घेतल्यानंतर अतिशय जोखमीच्या वातावरणात काम करूनसुध्दा साधा तापदेखील आला नाही. याची दोन कारणे आहेत. एक तर ‘लस’ आणि दुसरे दक्षता. लस घेतल्यामुळे आत्मविश्वास वाढला आहे, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता आपले जीवन सुरक्षित करण्याच्या दृष्टीने लसीकरण एकमेव उपाय आहे. लस घ्या व कोरोनापासून मुक्त राहा, लसच तुम्हाला कोरोनापासून खात्रीचे संरक्षण देणार आहे.