विजेच्या धक्याने गाय, म्हैश ठार; तीन घरांचे अंशत: नुकसान
By युवराज गोमास | Published: April 11, 2024 05:05 PM2024-04-11T17:05:18+5:302024-04-11T17:05:39+5:30
जिल्ह्यात आठवडाभरापासून अवकाळी वादळी पावसाचा तडाखा बसतो आहे. ४३ अंशावर पोहचलेली पारा एकदम ३१ अंशावर उतरला आहे.
भंडारा : जिल्ह्यात ११ एप्रिल रोजी वादळी पावसासह वीज कोसळल्याने दोन पशुंची हानी झाली. मोहाडी तालुक्यातील मौजा रोहणा येथील भाष्कर दामू पोटफोटे यांची म्हैश तर लाखनी तालुक्यातील मेंगापूर येथील सत्यपाल विठोंबा खंडाईत यांची गाय बुधवारला रात्रीच्या सुमारास विजेच्या धक्याने मरण पावली. मोहाडी व तुमसर तालुक्यात ३ घरांचे अंशत: नुकसान झाले. पारा ३१ अंशावर उतरला. निवडणूक प्रचाराला अडथळा आला असून पिकांचे नुकसान झाले आहे.
जिल्ह्यात आठवडाभरापासून अवकाळी वादळी पावसाचा तडाखा बसतो आहे. ४३ अंशावर पोहचलेली पारा एकदम ३१ अंशावर उतरला आहे. थंडी वाजायला सुरूवात झाली आहे. बुधवारला मध्यरात्रीपासून जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाला. ग्रामीण, जिल्हा, राज्य व राष्ट्रीय महामर्गावर ठिकठिकाणी पाणी साचून चिखलाचे साम्राज्य पहावयास मिळाले. लग्न सोहळे व लोकसभा निवडणुकांच्या प्रचारावर परिणाम जाणवला. उन्हाळी पिकांचे काही प्रमाणात नुकसान झाल्याचा अंदाज आहे.जिल्ह्यात सध्या भंडारा-गाेंदिया लोकसभा मतदार संघासाठी प्रचाराला वेग आला आहे. उमेदवारांची प्रत्येक गावात पोहचण्याची धडपड सुरू आहे. परंतु, निवडणुकांच्या रणधुमाळीत वातावरणाचा अडथळा येत आहे. प्रचारसभा सुरू असताना वादळी वारा व पाऊस होत असल्याने मतदार घराकडे पळ घेत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. बुधवारला सकाळच्या सुमारास पाऊस बरसत राहिल्याने उमेदवारांना प्रचार सभा घेता आल्या नाहीत.
रस्त्यांवर पडलेल्या खोल खड्ड्यांत पाणी साचल्याने चिखलातून वाहने घसरून अनेकजण किरकोळ जखमी झाले. लोंबीवर असलेला धान पीक जमिनीवर लोळला. फुलांवर असलेल्या उन्हाळी मूंगाचे मोठे नुकसान झाले.
आठवडी बाजारांना फटका
ग्रामीण भागात अनेक ठिकाणी आठवडी बाजार भरतात. परंतु, ऐन बाजाराच्यावेळी वादळी वाऱ्यासह पाऊस बरसत असल्याने व्यावसायिकांची तारांबळ उडत आहे. शिवाय ग्राहकांची संख्या रोडावत असल्याने व्यावसायिक नुकसानही होत आहे.
बॉक्स
वीटभट्टी व्यावसायिकांचे मोडले कंबरडे
जिल्ह्यात वीटभट्टी व्यवसायातून ग्रामीणांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळतो. परंतु, आठवड्यापासून होत असलेल्या अवकाळीने कच्च्या विटांचे नुकसान होत आहे. नुकसान वाढण्याच्या भीतीने व्यावसायिकांनी विटभट्टीचा व्यवसाय थांबविल्याने ग्रामिणांचा रोजगार बुडाला आहे.
जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह वादळी अवकाळी पाऊस बरसत असल्याने नागरिकांनी सावध असावे. वीज लखलखत असताना घराबाहेर जाण्याचे टाळावे. वादळी वाऱ्यात झाडांखाली थांबू नये. हवामान खात्याचा अंदाज घेत शेतीच्या कामांचे नियोजन करावे. - अभिषेक नामदास, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, भंडारा.