आपत्ती व्यवस्थापनाचा सूक्ष्म आराखडा तयार करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:26 AM2021-05-29T04:26:28+5:302021-05-29T04:26:28+5:30
भंडारा: मान्सून अगदी हाकेच्या अंतरावर येऊन ठेपला असून गेल्या वर्षीचा अनुभव लक्षात घेता पूर व अतिवृष्टीचा सामना करण्यासाठी आपत्ती ...
भंडारा: मान्सून अगदी हाकेच्या अंतरावर येऊन ठेपला असून गेल्या वर्षीचा अनुभव लक्षात घेता पूर व अतिवृष्टीचा सामना करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापनाचा सुक्ष्म आराखडा तयार करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी सर्व यंत्रणांना दिले. दूरदृश्य प्रणालीव्दारे शुक्रवारी आपत्ती व्यवस्थापनाची तयारी व कोविड-१९ चा आढावा त्यांनी घेतला, त्यावेळी ते बोलत होते. निवासी उपजिल्हाधिकारी शिवराज पडोळे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अभिषेक नामदास व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी हे ऑनलाईन उपस्थित होते.
भंडारा जिल्ह्यातून कन्हान, सूर, बावनथडी व चुलबंद या नद्या वाहतात. या नद्यांच्या काठावर १५४ गावे आहेत. मध्यप्रदेशातील संजय सरोवर, सिरपूर, पुजारीटोला, कालीसराड व इटियाडोह या धरणांमुळे जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण होते. गेल्यावर्षी संजय सरोवरातून सोडलेल्या पाण्यामुळे जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली होती. हा अनुभव पाहता यावर्षी आतापासून तयारी करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. तात्पुरता निवारा, नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याची व्यवस्था, औषध व अन्नपुरवठा, पोहणाऱ्या व्यक्तींची यादी आदींचा तत्काळ आढावा घेऊन व्यवस्थेचे नियोजन करण्यात यावे, असे त्यांनी सांगितले.
पुरामुळे भंडारा जिल्ह्यातील १८ गावांचा संपर्क तुटतो. अशा गावांना आत्ताच उपविभागीय अधिकाऱ्यांनी भेटी देऊन तेथील नागरिकांशी चर्चा करावी. त्याचप्रमाणे अतिवृष्टी व पुरामुळे जिल्ह्यातील ३० मार्गावरील वाहतूक बंद होते. यात मोहाडी व साकोली तालुक्यातील मार्गाचा समावेश आहे. या ठिकाणी सुद्धा भेटी देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. आपत्ती ही सांगून येत नसल्यामुळे सतर्कता व नियोजन आवश्यक आहे. विभागांनी यासाठी समन्वय ठेवावा.
नागरिकांसाठी तात्पुरते निवासी शिबिर उभारताना त्याठिकाणी मूलभूत सुविधा असतील याची खात्री करुन घ्यावी. नसल्यास त्या उभारण्यात याव्यात असे जिल्हाधिकारी म्हणाले. १५ व्या वित्त आयोगातून प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये विलगीकरण कक्ष निर्माण करण्याच्या शासनाच्या सूचना आहेत. हे करत असताना विलगीकरण कक्ष व तात्पुरते निवारा शिबिर वेगवेगळे असावे ते एकच असू नये असे निर्देश त्यांनी दिले. पावसाळ्यापूर्वी गावांमध्ये आवश्यक लसी, औषध साधन सामुग्री पुरेशा प्रमाणात उपलब्ध ठेवावी. पुरामुळे बाधित होणाऱ्या गावांशी संपर्क तुटणाऱ्या गावांकरिता तीन महिन्याचे आगाऊ राशन पुरवठा करण्यात यावा.
आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत २८ मे रोजी पवनी, मोहाडी, तुमसर व भंडारा या ठिकाणी तयारीची रंगीत तालीम घेण्यात येणार आहे. यावेळी आपत्ती येताच यंत्रणांचा प्रतिसाद, कृती व तयारी याची चाचणी यावेळी घेण्यात येणार आहे. प्रत्येक यंत्रणेची प्रतिसाद वेळ सुद्धा नमूद करण्यात येणार आहे. ही रंगीत तालीम मान्सूनपूर्व तयारीची पहिली स्टेप असणार आहे. यंत्रणांनी आपत्तीशी सामना करण्यासाठी आपत्ती यंत्रणा सज्ज ठेवावी. या मॉक ड्रिलला जिल्हाधिकारी स्वत: उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी कोविड-१९ चाही आढावा घेतला. जिल्ह्यातील मायक्रो कंटेनमेंट झोनला उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांनी भेट देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
बॉक्स
मान्सून २०२१ अंतर्गत करावयाची कामे
मान्सून २०२१ अंतर्गत आपत्ती व्यवस्थापनाची रंगीत तालीम, धोक्याचे ठिकाणी, रस्त्यावर सूचना फलक लावणे, जे रस्ते, पूल, इमारती धोक्याच्या आहेत त्याबाबत तत्काळ कार्यवाही करणे, मासेमार संघटनेसोबत बैठक घेणे व समन्वय करणे, शिधा पुरवठा करणे, जुन्या पुलांचे स्थापत्य परीक्षण करणे, नाल्यांचे खोलीकरण करणे, संभाव्य पूरग्रस्त गावांतील संपर्क क्रमांक अद्ययावत यादी, तात्पुरते निवाऱ्यांची यादी बनविणे, तेथील स्थापत्य परीक्षण व जेवण, पाणी इ. सुविधांबाबत निश्चितीकरण, तालुकानिहाय हेलिपॅड निश्चित करणे, स्थानिक नावाडी व पोहणाऱ्यांचे अद्ययावत संपर्क यादी, संभाव्य मान्सून काळातील एएनसी यांची यादी तयार करणे व त्या अनुषंगाने कार्यवाही करणे, पास सिस्टीम बाबत कार्यवाही करणे, संभाव्य पूर बाधित होणाऱ्या घरांना, ज्यांचे पुनर्वसन झालेले आहे परंतु त्यांनी घरे सोडलेली नाही, अतिक्रमणातील घरे यांना नोटीस देणे या बाबींचा समावेश आहे.