मुलींच्या प्रगतीसाठी पोषक वातावरण निर्माण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2018 10:29 PM2018-02-09T22:29:01+5:302018-02-09T22:30:13+5:30
मुलीच्या जन्माचे स्वागत करण्यासाठी कार्यक्रम आयोजित करावे लागते ही काळाची गरज आहे, कारण आज मुलामुलींचे गुणोत्तर प्रमाणात घट झाली आहे.
आॅनलाईन लोकमत
भंडारा : मुलीच्या जन्माचे स्वागत करण्यासाठी कार्यक्रम आयोजित करावे लागते ही काळाची गरज आहे, कारण आज मुलामुलींचे गुणोत्तर प्रमाणात घट झाली आहे. जिल्हयात हा अभिनव कार्यक्रम आयोजित करुन मुलींच्या जन्माचे प्रमाण आपणास वाढवावयाचे आहे, हा संदेश राज्यात सर्व दूर पर्यंत पोहचवायचा आहे. मुलीचा जन्म घेऊन आज मी या पदावर आहे. याबद्दल मला अभिमान आहे. म्हणून मुलींना जगू दया, शिकु दया व सक्षम करुन मुलीच्या प्रगतीसाठी पोषक वातावरण निर्माण करा, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू यांनी केले.
मुलीच्या जन्माचे स्वागत या सप्ताहाचा समारोप जिल्हा परिषद सभागृहात झाला, त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी मनोजकुमार सुर्यवंशी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रवीशेखर धकाते, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनिता बढे, जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते, जिल्हा आरोग्य अधिकारी कमलेश भंडारी, शिक्षणाधिकारी माध्यमिक दत्तात्रय मेंढेकर उपस्थित होते.
विनिता साहू पुढे म्हणाल्या, मुलींना वाईट नजनेतून पाहू नये, असे पालकांनी मुलांना सांगावे. त्यासाठी परीवर्तन आवश्यक आहे. मुली व मूले समान आहेत ही भावना त्यांच्यात निर्माण करणे गरजेचे आहे. मुलींचे घरुन पळून जाण्याचे प्रमाण जिल्हयात फार आहे. तसेच पळवून नेण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यासाठी पोलीस विभागाच्या वतीने कार्यशाळा व फिरते पोलीस स्टेशनद्वारे जनजागृती करण्यात येत आहे. प्रेम, आदर, व जगण्याचे स्वातंत्र घरात मिळाल्यास मुली पळून जाणार नाहीत. मुलींना आपुलकीने वागविण्याची जाबाबदारी कुटुंबाने स्विकारावी. यावेळी मनोजकुमार सुर्यवंशी म्हणाले, मुलीच्या जन्माचे गुणोत्तर प्रमाण कमी झाले आहे. जिल्ह्यात हा दर केवळ ९८२ एवढा आहे. मुलींच्या जन्माचे दर वाढविण्यावर भर देण्यासाठी लिंग परिक्षण चाचणी करणाऱ्यावर जिल्हा प्रशासन व जिल्हापरिषदेच्या वतीने कडक कारवाई करण्यात येणार आहे. मुलीच्या जन्माचे स्वागत या मोहिमेचे आपण साक्षीदार म्हणून काम करा, समाज भावना बदला. कारण प्रत्येक आईला आपले बाळं जिवापेक्षा मोठे असते. पशुपक्ष्यांना सुध्दा भावना असतात मग मानवाला का नाही. मुली मुलांपेक्षा कर्तव्यदक्ष आहेत. त्या कोणताही कार्यभार सक्षमपणे साभाळतात. मानसिकता बदला तरच मुलींचे प्रमाण वाढण्यास मदत होईल. भंडारा जिल्हयाचे मुलींचे गुणोत्तर प्रमाणात वाढ करुन देशात नाव कमवा. मुली असलेल्या मातांचे समुपदेशन करा, असेही ते म्हणाले.
यावेळी या सप्ताहानिमित्त जिल्ह्यात आयोजित विविध स्पर्धांच्या विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. या कार्यक्रमाचे संचालन स्मिता गालफाडे यांनी केले तर आभार माधूरी माथूरकर यांनी मानले.