भटक्या विमुक्तांसाठी स्वतंत्र मंत्रालय तयार करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2019 10:47 PM2019-01-01T22:47:52+5:302019-01-01T22:48:33+5:30
आजपर्यंत ज्यांना काहीच मिळाले नाही. मूलभूत गरजाही त्यांच्या समोर सातत्याने समस्या होऊन उभ्या असतात. सगळ्यात मागास असणारे भटके विमुक्त समाज विकासापासून कोसो दूर आहेत. त्यामुळे या भटक्या विमुक्त समाजाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी सरकारने स्वतंत्र मंत्रालय स्थापन करावे, असे प्रतिपादन राष्ट्रीय भटक्या विमुक्त जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष दादासाहेब इदाते यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
साकोली : आजपर्यंत ज्यांना काहीच मिळाले नाही. मूलभूत गरजाही त्यांच्या समोर सातत्याने समस्या होऊन उभ्या असतात. सगळ्यात मागास असणारे भटके विमुक्त समाज विकासापासून कोसो दूर आहेत. त्यामुळे या भटक्या विमुक्त समाजाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी सरकारने स्वतंत्र मंत्रालय स्थापन करावे, असे प्रतिपादन राष्ट्रीय भटक्या विमुक्त जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष दादासाहेब इदाते यांनी केले.
साकोली येथे रविवारला परेड ग्राऊंड मैदानावर मत्स्य सहकार महर्षी खासदार स्व. जतिरामजी बर्वे यांचा जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त मासेमारांच्या महामेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आर्टीजन वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष सदाशिव हिवलेकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून बर्वे स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष अशोक बर्वे, प्रमोद काळबांधे, दीनानाथ वाघमारे, मुकुंद अडेवार, भंडारा मच्छीमार संघाचे अध्यक्ष प्रकाश पचारे, जेष्ठ साहित्यिक माणिक गेडाम, कृष्णाजी नागपूरे, के. एन. नान्हे, राजेंद्र बढीये, धर्मपाल शेंडे, टेकचंद मारबदे, चंद्रपूर जिल्हा सहकारी बँकेचे यशवंत दिघोरे, संजय केवट आदी उपस्थित होते.
दादासाहेब इदाते म्हणाले, शेवटच्या घटकांत मोडणाऱ्या विमुक्त भटके मासेमार समाजाला शासनाकडून सर्व सोयीसवलती देऊन प्रगत समाजाच्या बरोबरीने आणावे लागेल. भटक्या-विमुक्तांसाठीही कायमस्वरूपी आयोग स्थापन करण्यात यावा. आदिवासींसाठी केंद्रात स्वतंत्र मंत्रालय आहे. त्याच धर्तीवर या समाजासाठी स्वतंत्र मंत्रालय निर्माण करावे. भटक्या विमुक्त जातीत येणाºया हा मासेमार समाज प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या प्रवर्गात आहे. त्यामुळे एका समाजाला देशभर एकाच प्रवर्गाचा दर्जा देण्यात यावा, गत तीन वर्षांत ३६ राज्यातील एक हजार ६५८ जातीच्या लोकांना भेटलो. त्यांच्या सामाजिक व आर्थिक मागासलेपणाचा अभ्यास केल्यावर त्या आधारे इदाते आयोग तयार करून २० ठळक मागण्या केल्या आहेत. भटके, विमुक्त, मच्छिमार, विशेष मागासवर्गीय अशा उपेक्षित व वंचित जमातीच्या मागण्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापुढे मांडल्या आहेत. या मागण्या मान्य झाल्या नाही तर, पुढच्या निवडणुकीत आम्ही आमचे काम करू, असा गर्भीत इशाराही त्यांनी दिला.
सदाशिव हिवलेकर यांनी भारत सरकारने इदाते आयोग लागू करावा, भटक्या-विमुक्तांना घटनात्मक संरक्षण द्यावे, मासेमारांसाठी कल्याणकारी धोरण लागू करावे, स्थानिक स्वराज्य संस्थांत स्वतंत्र आरक्षण द्यावे, तलावांची लीज पूर्ववत करावी या मागण्या केल्या.
यावेळी दीनानाथ वाघमारे, डॉ. योगेश दुधपचारे यांनी मार्गदर्शन केले. महिला कार्यशाळेत महिला संघर्ष वाहिनीतर्फे शिक्षण, रोजगार, बचतगट आदी विषयांवर अर्चना डोंगरे, भाग्यश्री ठाकरे, प्रणिती मेश्राम यांनी मार्गदर्शन केले. संचालन डॉ. योगेश दुधपचारे यांनी केले. आभार प्रणिती मेश्राम यांनी मानले. यावेळी जिल्ह्यातील समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाोसाठी अशोक शेंडे, उमराव मांढरे, हरिश्चंद्र शहारे, यशवंत दिघोरे, राहुल पडाळ, मनोज केवट, अमोल बावणे, वासुदेव खेडकर, मनिराम मौजे, हर्षल वाघमारे, सूनिता मोहनकर यांनी सहकार्य केले.