... अन् मोबाइल टॉर्चच्या उजेडात करावे लागले पार्थिवावर अंत्यसंस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2022 02:10 PM2022-09-01T14:10:05+5:302022-09-01T14:13:11+5:30
सिल्ली येथील प्रकार, स्मशानभूमीत सुविधांचा अभाव
विलास खोब्रागडे
सिल्ली (भंडारा) : भंडारा तालुक्यातील सिल्ली येथील स्मशानभूमी समस्यांच्या विळख्यात सापडली असून, स्मशानभूमीकडे जाण्यासाठी पक्का रस्ता व पथदिवे नाहीत. अंत्यविधी शेड बोअरवेल भोवती झाडीझुडपी व कचरा वाढला आहे. येथे सोलर लाईट किंवा विद्युत दिवे नाहीत. त्यामुळे रात्रीच्या सुमारास मोबाइल टॉर्चच्या उजेडात पार्थिवावर अंत्यविधी करण्याची वेळ नागरिकांवर येत आहे. मृत्यूनंतरही मृतदेहाला मरणयातना सोसाव्या लागत आहेत, अशी संतप्त प्रतिक्रिया गावकरी देत आहेत.
भंडारा शहरालगत हाकेच्या अंतरावरील सिल्ली येथील राजू हुमणे यांचा ३० ऑगस्ट रोजी तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. त्यामुळे शवविच्छेदन करून रात्री ८ वाजताच्या सुमारास त्यांचा मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आला. रात्रीला अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय हुमणे कुटुंबाने घेतला. स्मशानभूमीकडे अंत्ययात्रा निघाली. स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता चिखलमय असून रस्त्याच्या दोन्ही बाजूला काटेरी गवत वाढले आहे. अंत्यविधीसाठी जाणाऱ्या नागरिकांना पायवाट शोधताना कसरत करावी लागली.
स्मशानभूमी परिसरातही काटेरी झुडपे आणि रानगवत वाढले आहे. अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांना जीव मुठीत घेऊन कचऱ्यात उभे राहावे लागते. स्मशानभूमीत कचरा की कचऱ्यात स्मशानभूमी, असा सवाल नागरिकांनी स्थानिक प्रशासनाला केला आहे. रस्त्याच्या कडेला पथदिवे नाहीत. त्यामुळे रात्रीच्या वेळी अंत्ययात्रेत जाताना पायवाट दिसत नसून अंत्यविधीकरिता स्मशानभूमीत कसे जावे, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. अंत्यविधी शेडजवळ सोलर लाईट किंवा विद्युत दिवे नाहीत. त्यामुळे रात्रीच्या वेळी अंतिम संस्कार करताना नागरिकांना मोबाइल टॉर्चच्या उजेडात अंत्यविधी करावे लागले.
सिमेंट रस्त्याचे बांधकामही अर्धवट
जनसुविधा निधीतून स्मशानभूमीकडे जाण्यासाठी सिमेंट रस्त्याचे बांधकाम करण्यात आले. मात्र ते बांधकाम अर्धवट असून त्या रस्त्यावर ठिकठिकाणी भगदाड पडले आहे. त्यामुळे पायी चालताना त्रास सहन करावा लागतो. गावातील वाढती लोकसंख्या पाहता ही एकमेव स्मशानभूमी असून या स्मशानभूमी परिसरात बैठक व्यवस्था, पिण्याचे पाणी, पक्का रस्ता, विजेचे दिवे, शोकसभेसाठी सभा मंडप इत्यादी समस्या लवकर मार्गी लावण्याची ग्रामवासीयांची मागणी आहे.