रेमडेसिविरचा अपुरा पुरवठा करणाऱ्यावर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:33 AM2021-04-19T04:33:08+5:302021-04-19T04:33:08+5:30
भंडारा : शहरातील रुग्णालयांना पुरवठा करण्यासाठी आलेल्या रेमडेसिविरचा अपुरा पुरवठा केल्याप्रकरणी येथील दवाबाजार परिसरातील एका औषध विक्रेत्यावर गुन्हा दाखल ...
भंडारा : शहरातील रुग्णालयांना पुरवठा करण्यासाठी आलेल्या रेमडेसिविरचा अपुरा पुरवठा केल्याप्रकरणी येथील दवाबाजार परिसरातील एका औषध विक्रेत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई अन्न व औषधी प्रशासन विभागाने केली.
रामदास कवडूजी कुरंजेकर (५२) असे गुन्हा दाखल झालेल्या औषध विक्रेत्याचे नाव आहे. त्याची माेठ्या बाजार परिसरात साई मेडिकल एजन्सी आहे. भंडारा येथे परजिल्ह्यातून रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा करण्यात आला. ताे साई एजन्सीला प्राप्त झाला हाेता. हे इंजेक्शन शहरातील लक्ष हाॅस्पिटल आणि न्यू लाईफ हाॅस्पिटल यांना वितरित करण्याचे आदेश देण्यात आले हाेते. परंतु कुरंजेकर यांनी अपुरे इंजेक्शन पुरविल्याचे पुढे आले. त्यावरून अन्न व औषधी प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त प्रशांत रामटेके यांनी १३ एप्रिल राेजी औषधी पेट्यांची तपासणी केली. त्यावेळी हा प्रकार उघडकीस आला.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिलेल्या आदेशाचे उल्लंघन आणि जीवनावश्यक वस्तूचा बेकायदा साठा करून विक्री केल्याचे दिसून आले. यावरून भंडारा शहर पाेलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. त्यावरून शनिवारी रात्री याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पाेलीस उपनिरीक्षक अशाेक जटाळ करीत आहेत. या प्रकाराने शहरात खळबळ उडाली आहे.