भंडाराच्या आमदारांसह ५० जणांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:54 AM2021-01-08T05:54:44+5:302021-01-08T05:54:44+5:30
भंडारा : येथील महर्षी विद्या मंदिर शाळेच्या आवारात कोणतीही पूर्वसूचना न देता अनधिकृत प्रवेश करून कर्मचाऱ्यांना शिवीगाळ आणि मारहाण ...
भंडारा : येथील महर्षी विद्या मंदिर शाळेच्या आवारात कोणतीही पूर्वसूचना न देता अनधिकृत प्रवेश करून कर्मचाऱ्यांना शिवीगाळ आणि मारहाण केल्याप्रकरणी आमदार नरेंद्र भोंडेकर सह ५० जणांवर जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भंडारा लगत फुलमोगरा येथे महर्षी विद्या मंदिर ही शाळा आहे. सीबीएसई शाळांच्या विरोधात शिक्षा बचाव समितीच्या वतीने गत १७ दिवसापासून आंदोलन सुरु आहे. दरम्यान पालकांच्या तक्रारीवरुन आमदार नरेंद्र भोंडेकर, शिक्षा बचाव समितीचे प्रवीण उदापुरे आणि इतर मंडळी या शाळेत सोमवारी पोहचले. त्या ठिकाणी वाद झाला. याप्रकरणी नवीनप्रभात परंदुगिरी (३७) यांनी जवाहरनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्या तक्रारीत नवीनप्रभात यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. शाळेच्या विरोधात घोषणा देऊन गोंधळ केला. प्राचार्य कक्षासमोरील कुंड्यांची तोडफोड केली आणि जिवे मारण्याची धमकी दिली अशी तक्रार दिली आहे. त्यावरुन आमदार नरेंद्र भोंडेकर, प्रवीण उदापुरे यांच्यासह ५० जणांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोट
पालकांच्या तक्रारी आपणास प्राप्त झाल्या होत्या. लोकप्रतिनिधी म्हणून आपण महर्षी शाळेत गेलो. मात्र तेथे माझ्यासह कार्यकर्त्यांना आत येण्यास मनाई केली. या सर्व प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी आपण शिक्षण मंत्रालयासह वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली आहे. तसेच आपणावर लावलेले गुन्हेही चुकीचे आहेत. याप्रकरणीही दाद मागणार आहो.
-नरेंद्र भोंडेकर, आमदार भंडारा.
कोणतीही पूर्वसूचना न देता आमदार नरेंद्र भोंडेकर आपल्या समर्थकांसह महर्षी शाळेत शिरले. या ठिकाणी गोंधळ घालत शिक्षकांना मारहाण करण्यात आली. दुपारी १२ वाजतापासून ९ वाजेपर्यंत शाळेला वेठीस धरले. त्यांचे काही म्हणणे असते तर त्यांनी मला प्रत्यक्ष भेटणे आवश्यक होते. पूर्व नियोजित पद्धतीने १०० ते १५० लोकांना सोबत घेऊन शाळेत शिरणे योग्य नाही. गत काही महिन्यापासून शाळेला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरु आहे.
-श्रुती ओहळे, प्राचार्य महर्षी विद्या मंदिर, भंडारा.