महागाई व जलसंकटाने घरकुल लाभार्थ्यांवर ओढावले संकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 10:09 PM2019-04-11T22:09:43+5:302019-04-11T22:10:36+5:30
जिल्ह्यात यावर्षी पाणीटंचाईसह, सिमेंटच्या किंमतीमध्ये भरमसाठ वाढ झाल्याने त्याचा परिणाम बांधकाम व्यवसायावरती होऊ लागला आहे. अनेकजण बांधकाम करण्यासाठी टाळाटाळ करीत आहे. एका महिन्यात सिमेंटचे दर पोतीमागे ६० ते ७० रूपयाने वाढल्याने बांधकाम व्यवसायीक पुरते मेटाकुटीस आले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्यात यावर्षी पाणीटंचाईसह, सिमेंटच्या किंमतीमध्ये भरमसाठ वाढ झाल्याने त्याचा परिणाम बांधकाम व्यवसायावरती होऊ लागला आहे. अनेकजण बांधकाम करण्यासाठी टाळाटाळ करीत आहे. एका महिन्यात सिमेंटचे दर पोतीमागे ६० ते ७० रूपयाने वाढल्याने बांधकाम व्यवसायीक पुरते मेटाकुटीस आले आहेत.
सिमेंटच्या अमर्याद दरवाढीमुळे विकास कामांसह वैयक्तीक घरे उभारणाऱ्या सामान्य नागरिकांचे आर्थिक गणित कोलमडून गेले आहेत. परिणामी भंडारा शहरासह जिल्ह्यातील बांधकाम उद्योग ठप्प होण्याचे संकट ओढवले आहे. वाढत्या सिमेंट दराला नियंत्रणात ठेवण्यात शासनही अपयशी ठरले आहे. बांधकामासाठी सिमेंट, लोखंड , वाळू , पाणी आदी अत्यावश्यक असून याचे दर नेहमीच अस्थिर राहतात. याचाच फायदा जिल्ह्यातील वाळूतस्करीला प्रोत्साहन मिळत आहे. मागील वर्षभरापासून वाळू मिळणे दुर्मिळ झाले असून वाळूच्या दरात देखील सातत्याने वाढ होते आहे. घर बांधकामासाठी मिळेल त्या दरात वाळूची खरेदी करणे ग्राहकांची समस्या बनली आहे. देशातील सिमेंट उत्पादकांच्या अमर्याद दरवाढीचा बांधकाम व्यवसायावर मोठ्या प्रमाणात होत आहे.
मार्च अखेर सिमेंटदरात वाढ होवून सिमेंटच्या एका बॅगची किंमत ५० किलोला ३५० ते ४०० रूपयांवर पोहचली आहे. स्टिलच्या किंमतीही ४१ ते ४४ रूपये प्रति किलो वर पोहचल्या आहेत. त्यातच वाळू मिळणे दुरापास्त झाल्याने घरबांधकाम करणे ही सर्व सामान्यांच्या हातातील गोष्ट राहिलेली नाही. त्यामुळे वाढत्या बांधकाम साहित्यांच्या किंमतीवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.
ग्रामीण भागात सिमेंटचा तुटवडा
एखादे बांधकाम करताना बांधकाम कंत्राटदाराकडून पहिल्या टप्प्यातच बांधकाम साहित्यासाठी ५० टक्यापेक्षा जास्त रक्कम वसूल केली जाते. बांधकाम साहित्य एजन्सीधारकही साहित्यासाठी अॅडव्हान्स रक्कम घेतात. पण पैसे देऊनही बांधकाम साहित्यासाठी टोलवाटोलवी करतात. आॅडरप्रमाणे पैसे देऊनही बांधकामाच्या पुढील टप्प्यासाठी दर वाढणार असल्याने ग्राहकांना एजन्सीधारकांकडून सांगितले जाते. त्यामुळे संपूर्ण बांधकामासाठीच लागणाºया साहित्याची बुकिंग करण्यासाठी आगावू रक्कम घेतले जाते. परंतु दोन दोन महिन्यांचा कालावधी लोटूनही वेळेत सिमेंट तसेच बांधकाम साहित्य मिळत नाही. त्यामुळे घरकुल लाभार्थी संकटात आहे.
पाणीटंचाईचा जाणवतोय परिणाम
यावर्षी कमी झालेल्या पर्जन्याचा परिणाम बांधकाम व्यवसायावर दिसून येत आहे. अनेक ठिकाणी पाणीटंचाई असल्याने बांधकामास टाळाटाळ होत असल्याने त्याचा परिणाम जिल्ह्यातील रोजगारावर होत आहे. बांधकाम साहित्याच्या वाढत्या किंमतीमुळे तसेच पाणीटंचाईमुळे अनेक घरकुलांसह, अनेकांची बांधकामे रेंगाळली आहेत. .