सिमेंट रस्त्यांचे निकृष्ट बांधकाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 10:08 PM2018-04-25T22:08:18+5:302018-04-25T22:08:18+5:30
ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी शासनाद्वारे महात्मा गांधी रोजगार हमी योजना सुरू करण्यात आली. याद्वारे सिंचन विहिर, भात खाचरे, नाला सरळीकरण, नाली बांधकाम, सिमेंट रस्ते, पांदन रस्ते असे विविध विकास कामे केली जात आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
लाखांदूर : ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी शासनाद्वारे महात्मा गांधी रोजगार हमी योजना सुरू करण्यात आली. याद्वारे सिंचन विहिर, भात खाचरे, नाला सरळीकरण, नाली बांधकाम, सिमेंट रस्ते, पांदन रस्ते असे विविध विकास कामे केली जात आहेत. या माध्यमातून मजुरांना रोजगार देखील उपलब्ध करून दिला जातो आहे. मात्र यात सिमेंट रस्त्यांचे निकृष्ट बांधकाम होत असून प्रशासन, ग्रामपंचायत प्रशासन व कंत्राटदारांनी आपली खिसे भरण्याचे काम सुरू केले आहे.
असाच काही प्रकार तालुक्यातील मोहरणा येथे महात्मा गांधी रोजगार हमी योजना सन २०१७-१८ अंतर्गत दोन सिमेंट कॉंक्रीट रस्त्याचे काम करण्यात आले असून, दोन्ही रस्ते निकृष्ट दर्जाचे करण्यात आले आहेत. काम केल्याच्या दहा दिवसातच रस्त्याला भेगा पडल्या आहेत.
प्रशासकीय मान्यता ६० दि.२२/०१/२०१८ अंतर्गत ९ लक्ष ९७ हजार ४६० रूपयाची २५० मीटर लांबीची दोन सिमेंन्ट रस्ते करण्यात आली असून, त्यात उद्धव उरकुडे, मोरेश्वर राऊत ते कुशन मेश्राम यांच्या घरापर्यंत १२५ मीटर लांबी तर श्रीराम भागडकर ते रामदास राऊत यांच्या घरापर्यंत १२५ मीटर लांबीची अंदाजपत्रकीय रक्कमेनुसार ४ लक्ष ९८ हजार ७३० रूपयाची कामे करण्यात आली आहेत.
मात्र सदर दोन्ही रस्त्याचे काम करताच रस्त्याला भेगा पडल्या असल्याचे ग्रामस्थांकडून नाराजीचा सूर निघत आहे. काम करणारी यंत्रणा खुद्द ग्रामपंचायत असून, या कामाच्या माध्यमातून ग्रा.पं.पदाधिकाऱ्यांनी स्वत:ची खिसे भरण्याच्या लालसेपोटी ग्रामस्थांचे नुकसान केले आहे.
माहितीनुसार काम करणारी यंत्रणा ग्रामपंचायत मोहरणा असली तर सदर काम गावप्रमुखाने आपल्या मजीर्तील लोकांना करण्यासाठी दिले असल्याचे बोलले जात आहे. करण्यात आलेले काम निकृष्ट असल्याचे आढळून आल्याने ग्रामस्थांनी ही बाब वॉर्ड सदस्यांसमोर कथन केली. त्यानुसार वॉर्ड सदस्यांनी झालेल्या गैरप्रकाराविरोधात आवाज उठवित दोषींवर कारवाईची मागणी केली आहे.