करडी येथे आम्रवृक्षाची खुलेआम होत आहे कत्तल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 10:15 PM2019-04-12T22:15:10+5:302019-04-12T22:25:17+5:30
करडी येथे लाकूड कंत्राटदाराकडून कटाईची परवानगी न घेता अवैधरित्या फळझाडे तोडण्याचे काम सुरु आहे. आंबे लागलेल्या झाडांची खुलेआम कत्तल होत असतांना तुमसर वनविभागाचे ठेकेदारांच्या गैरप्रकारांकडे सर्रास दुर्लक्ष होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
करडी (पालोरा) : करडी येथे लाकूड कंत्राटदाराकडून कटाईची परवानगी न घेता अवैधरित्या फळझाडे तोडण्याचे काम सुरु आहे. आंबे लागलेल्या झाडांची खुलेआम कत्तल होत असतांना तुमसर वनविभागाचे ठेकेदारांच्या गैरप्रकारांकडे सर्रास दुर्लक्ष होत आहे. करडी गोटाळी मैदानाजवळ विनापरवानगी आंब्याच्या झाडांची कत्तल करण्यात आली असून प्रकरणी चौकशी व कारवाईची मागणी होत आहे.
फळांचे झाडे पशुपक्षी व मानवांसाठी मौल्यवान आहेत. त्यामुळे फळांचे झाड तोडण्यापुर्वी त्यांची रितसर वनविभागाकडून परवानगी घेण्याचे शासनाचे आदेश आहेत. परंतू करडी परिसरात मोठ्या प्रमाणात लाकूड ठेकेदारांनी नियमांना बगल देत मनमर्जीने फळझाडांच्या कत्तली सुरु केल्या आहेत. शेतकरीही पर्यावरणाच्या ºहासाचा विचार न करता दुर्लक्ष करुन ठेकेदारांकडून घरपोच पैसे मिळत असल्याने सातबारा व अन्य कागदपत्रे सुपूर्द करीत आहेत. अधिकारी सुध्दा ठेकेदारांकडून मिळणाऱ्या लालसेपोटी खसºयाच्या ठिकाणी जातांना दिसत नाही. कार्यालयातूनच सर्व सोपस्कर पार पाडीत ठेकेदारांना गैरप्रकार करण्याची परवानगी देत आहेत.
लाकूड कटाईच्या नियमानुसार झाडे कापण्यापूर्वी रितसर वनधिकाऱ्यांकडून परवानगी घेणे गरजेचे असते. तसेच कापलेल्या झाडांच्या ठिकाणीच अन्य सोपस्कर पार पाडल्यानंतर वाहतुकीची परवानगी दिली जाते. तोपर्यंत ठेकेदारांना शेतातून लाकडे बाहेर काढण्यास मनाई आहे. परंतू करडी परिसरात बेकायदेशिरपणे झाडांच्या अवैध कत्तली व वाहतूक केल्या जात आहेत. आता तर आंबे लागलेल्या फळझाडांना सुध्दा ठेकेदारांनी सोडलेले नाही. करडी गोटाळी मैदानाजवळील आंब्याचे मोठे झाड ठेकेदाराने कोणत्याही परवानगी न घेता कटाई केली असल्याने प्रकरणी चौकशी व कारवाईची मागणी होत आहे.
करडी परिसर ठेकेदारांसाठी नंदनवन
करडी परसर सध्या लाकूड ठेकेदारांचे नंदनवन ठरतांना दिसत आहे. या भागात बाहेरुन आलेले ठेकेदार कार्यरत आहेत. तुमसर वनविभागाच्या आशिर्वादाने सागवन व आडजातीचे झाडे परवानग्या न घेता तोडल्या जावून वाहतूक व साठवणूक गावाशेजारी केली जात आहे.
परिसरात खडकी, पालोरा, बोरगाव, करडी, पांजरा, नवेगाव, मोहगाव, निलज आदी गावात मोठ्या प्रमाणात लाकूड ठेकेदारांनी वाहतुकीची परवानगी न घेता लाकडांची साठवणूक केली आहेत. याकडे वनविभागाने लक्ष देण्याची गरज आहे.