मगरीने तयार केले स्वत:साठी घर!
By Admin | Published: January 14, 2017 12:25 AM2017-01-14T00:25:38+5:302017-01-14T00:25:38+5:30
तालुक्यातील सावरला येथील शेतकऱ्यांचे मालकी हक्क असलेल्या गावालगतच्या तलावात मगरीचे वास्तव्य असल्याने तलावाकडे नागरिक ये-जा करु लागले आहेत.
अशोक पारधी पवनी
तालुक्यातील सावरला येथील शेतकऱ्यांचे मालकी हक्क असलेल्या गावालगतच्या तलावात मगरीचे वास्तव्य असल्याने तलावाकडे नागरिक ये-जा करु लागले आहेत. दरम्यान मगरीने स्वरंक्षणासाठी तलावाच्या पाळीमध्ये मोठे छिद्र करुन स्वत:साठी घर तयार केले आहे.
सावरला तलावात मगरी असल्याचे वृत्त लोकमतने प्रकाशित केल्यानंतर परिसरातील नागरिकांचे लोंढे मगरीला पाहण्यासाठी तलावाकडे जावू लागले आहेत. कपडे धुवायला तलावाकडे जाणाऱ्या महिला व मासेमारीसाठी तलावात जाणारे ढिवर बांधव भयग्रस्त आहेत. मासेमारी करण्यासाठी जाणे भितीदायक असल्याने मच्छीमारांचे नुकसान होत आहे. त्यामुळे मगरीला शक्य तितक्या लवकर तलावातून बाहेर काढण्यात यावे, अशी मागणी जिल्हा मत्स्य उत्पादक संघाचे अध्यक्ष प्रकाश पचारे यांनी वनविभागाकडे केलेली आहे.
भर पावसाळ्यात म्हणजे आॅगस्ट २०१६ पासून मगरीचे ह्या तलावात वास्तव्य असल्याचे मासेमारी करणाऱ्यांना समजले होते. परंतु ती आली तशीच आपोआप बाहेर जाईल असे त्यांना वाटत असल्याने त्यांनी यापूर्वी वाच्यता केलेली नाही. अखेर लोकमतने बातमी प्रसिध्द केल्यानंतर सर्वांचे लक्ष मगरीच्या स्थलांतराकडे लागलेले आहे. मगरीला बाहेर काढण्यासाठी काय उपाययोजना करावी लागेल त्याचा आढावा घेण्यासाठी वनपरिक्षेत्राधिकारी डी. एन. बारई, सामाजिक वनीकरणाच्या लागवड अधिकारी भाग्यश्री पोले, सावरला क्षेत्राचे वनपाल अजीज खान यांनी सावरला तलावाजवळ जावून प्रत्यक्ष पाहणी केली. मासेमारी करणाऱ्या ढिवर समाजबांधवांसोबत चर्चा केली. मुख्य वनसंरक्षक नागपूर विभाग यांची परवानगी घेवून मगरीच्या स्थलांतरणासाठी रेस्क्यु आॅपरेशन राबविण्यात येईल, अशी माहिती यावेळी वनक्षेत्रअधिकारी यांनी दिली.