कारले पिकाला क्रॉप कव्हर ठरले लाखमोलाचे !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2021 05:00 AM2021-10-15T05:00:00+5:302021-10-15T05:00:02+5:30
लाखनी तालुक्यातील पालांदूर परिसरातील चुलबंद खोरे सदाबहार आहे. इस्त्राइल देशासारखी नियोजित तंत्रशुद्ध शेती चुलबंद खोऱ्यात अनुभवायला येत आहे. एकमेकांच्या सहकार्याने बागायती फुलविली जात आहे. पालांदूर परिसरात बागायतीत सर्वच पिके घेतली जातात. त्यांच्या पारंपरिक ज्ञानाला कृषी विभागाचे सहकार्य प्रेरणादायी ठरत आहे. होतकरू बागायतदार धान शेतीपैकी किमान एक एकर शेतीत भाजीपाल्याची शेती साकारतो आहे. वर्षभर ताजा भाजीपाला संपूर्ण भंडारा जिल्ह्याला मिळतो आहे.
मुखरू बागडे
लोकमत न्यूज नेटवर्क
पालांदूर : धान पीक शेतकऱ्यांना परवडणारे नसल्याने भाजीपाला पिकाकडे जिल्ह्यातील शेतकरी वळलेला आहे. लाखनी तालुक्यातील चुलबंद खोऱ्यात अनेक शेतकरी बारमाही भाजीपाल्याची शेती करतात. भाजीपाल्यात कारले, चवळी, यांचे ड्रिप मल्चिंगवर लागवड केलेली आहे. कारले पिकाला सुरक्षेकरिता कापडाचे आच्छादन अर्थात क्राप कव्हर लाख मोलाचे ठरलेले आहे. क्राप कव्हरमुळे पिकाला चाळीस दिवस पर्यंत अजिबात फवारणीची गरज पडत नाही हे विशेष !
लाखनी तालुक्यातील पालांदूर परिसरातील चुलबंद खोरे सदाबहार आहे. इस्त्राइल देशासारखी नियोजित तंत्रशुद्ध शेती चुलबंद खोऱ्यात अनुभवायला येत आहे. एकमेकांच्या सहकार्याने बागायती फुलविली जात आहे. पालांदूर परिसरात बागायतीत सर्वच पिके घेतली जातात. त्यांच्या पारंपरिक ज्ञानाला कृषी विभागाचे सहकार्य प्रेरणादायी ठरत आहे. होतकरू बागायतदार धान शेतीपैकी किमान एक एकर शेतीत भाजीपाल्याची शेती साकारतो आहे. वर्षभर ताजा भाजीपाला संपूर्ण भंडारा जिल्ह्याला मिळतो आहे. गत पावसाच्या दिवसात कोरोनाच्या संकटात भाजीपाल्याची शेती संकटात आली होती. भाव गडगडल्याने शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा तोटा सहन करावा लागला होता. परंतु जिद्द, चिकाटी, हेवा कायम ठेवीत चुलबंद खोऱ्यातील बागायतदारांनी पुन्हा कारली, चवळी बाग फुलविलेली आहे. संकटावर मात करुन भाजीपाला उत्पादकांनी कारली, चवळीची बाग फुलविली असली तरी वातावरणाचे संकट आहे.
शेतीनिष्ठ पुरस्कार प्राप्त अमृत मदनकर यांची भेट
- चुलबंद खोऱ्यातील कारले उत्पादनात अख्ख्या गावाला प्रेरणा देणारे गावचे सरपंच अमृत मदनकर यांची योगायोगाने पालांदूर येथे विभागीय कृषी सहसंचालक, कृषी अधिकाऱ्यांशी भेट झाली. यात कारले उत्पादनाच्या अनुषंगाने अमृतने अमृतवाणीने कडू कारले पिकविण्याचा गोड अभ्यास सांगितला. त्यात क्राप कव्हरची माहिती लाख मोलाची ठरली. शेतकऱ्यांना प्रेरणा देण्याकरिता क्राप कव्हरला शासकीय अनुदान मिळावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
विदर्भाचे कॅलिफोर्निया चुलबंद खोरे!
- कृषी अभ्यासकांना चुलबंद खोरे खुणावते आहे. चुलबंद खोऱ्याच्या मातीतील दम भाजीपाल्याची गुणवत्ता दाखवतो आहे. त्याची चव खवय्यांना भुरळ घालणार नाही तर नवल!, हे केवळ ऐकिवात असल्याने प्रत्यक्ष अनुभवण्याचा योग कृषी अभ्यासक टाळणार नाही हे निश्चित. नागपूर विभागीय कृषी सहसंचालक रवींद्र भोसले लाखनी तालुक्यात शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले. नकळत त्यांनी चुलबंद खोऱ्याचा अनुभव घेण्याकरिता सहकारी कृषी अधिकाऱ्यांना गळ घातली. थेट चुलबंद खोऱ्यात फळबाग, फूल शेती, भाजीपाल्याची शेती, ग्रास डिस्टिलेशन यासारख्या शेतात भेटी देत शेतकऱ्यांच्या श्रमाचे कौतुक केले. त्यांच्या जिद्दीला, मेहनतीला तंत्रज्ञानाची जोड देण्याची सूचना उपविभागीय कृषी अधिकारी पद्माकर गिदमारे , तालुका कृषी अधिकारी किशोर पाथरीकर, मंडळ कृषी अधिकारी गणपती पांडेगावकर यांना केली.
शेतकऱ्यांनी जैविक किटकनाशकाचा सुरुवातीपासून वापर करावा. शक्यतो कमीत कमी रासायनिक किटकनाशकाचा उपयोग साधावा. कृषी विभागाच्या शिफारशीनुसार प्रत्येक भाजीपाल्यावर कीडनाशकाची योग्य ती शिफारस केलेली आहे. त्याच नियोजनाने कीडनाशक नियंत्रणाकरिता फवारणी करावी.
-रवींद्र भोसले, विभागीय कृषी सहसंचालक, नागपूर.