धान पिकाचे ४५८ हेक्टरमधील पिकांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:34 AM2021-05-15T04:34:12+5:302021-05-15T04:34:12+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पालांदूर : दिनांक १० मे रोजी निसर्गाच्या दुष्टचक्राने आपली अवकृपा दाखवत पालांदूर मंडल कृषी कार्यालयांतर्गत ४५८.५० ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पालांदूर : दिनांक १० मे रोजी निसर्गाच्या दुष्टचक्राने आपली अवकृपा दाखवत पालांदूर मंडल कृषी कार्यालयांतर्गत ४५८.५० हेक्टर, लाखनी तालुक्यात ८३५.७० हेक्टरवरील धान पिकाचे गारपिटीने सुमार नुकसान केले. याची दखल तालुका प्रशासनाने घेत थेट नुकसानग्रस्त शेतांवर जेवनाळा येथे शेतकऱ्यांच्या उपस्थितीत भेट दिली. यावेळी तहसीलदार मल्लिक विरानी, तालुका कृषी अधिकारी पद्माकर गिदमारे, खंडविकास अधिकारी डॉ. जाधव, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक तथा शेतकरी बहुसंख्येने खेमराज गिरेपुंजे (जेवनाळा) यांच्या शेतावर उपस्थित होते.
सोमवारी भंडारा जिल्ह्यासह लाखनी तालुक्याला गारपिटीने जबरदस्त तडाखा दिला. दिवसभर मोकळे वातावरण असताना सायंकाळी सातच्या सुमारास वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. या गारपिटीत लाखनी तालुक्यात ३,१८४ हेक्टर धानाच्या क्षेत्रफळापैकी ८३५.७० हेक्टरचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यात प्रशासनाच्यावतीने ३३ टक्केच्या आत ४०७.८० हेक्टर, ३३ टक्केच्यावर ४२७.९० हेक्टर नुकसान नोंदविण्यात आले असून, १,०४३ शेतकरी संख्या दाखविण्यात आली आहे. पालांदूर मंडल कृषी कार्यालयांतर्गत उन्हाळी धानाचे लागवडीखालील एकूण क्षेत्रफळ १४६७.२० हेक्टर दाखविण्यात आले आहे. यापैकी ४५८.५० हेक्टर जमीन नुकसानग्रस्त दाखविण्यात आली. यात ३३ टक्केचे आत २०७.३० तर ३३ टक्केच्यावर २५१.२० हेक्टर दाखवली असून, यात ५०१ शेतकरी प्रभावित झाले आहेत. भाजीपाल्यात १०.७० हेक्टरचे नुकसान असून, यात २२ शेतकरी प्रभावित झाले आहेत. मुगाचे २.८० हेक्टरवरील नुकसान झाले असून, यात ६ शेतकरी प्रभावित झाले आहेत.
बॉक्स
शेतकरी गहिवरला
शेवटच्या टोकात मेहनतीअंती हातातोंडाशी आलेले पीक मातीमोल ठरल्याने शेतकरी सुमार संकटात सापडला आहे. तालुका प्रशासन प्रभावित शेतकऱ्यांच्या शेतात झालेल्या नुकसानाची पाहणी करताना विचारलेल्या माहितीत मात्र शेतकरी गहिवरला.
मंडल कृषी अधिकारी गणपती पांडेगावकर यांनीसुद्धा गारपिटीने नुकसानग्रस्त शेतीचे निरीक्षण करून माहिती गोळा केली. शेतकऱ्यांना धीर देत हे ही दिवस निघून जातील, अशी आशा दिली. पालांदूर मंडलांंतर्गत ३४ गावांतील शेती गारपीट, वादळ वाऱ्याने प्रभावित झाली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानाचा पंचनामा करून तत्काळ नुकसानभरपाई मिळावी, अशी रास्त अपेक्षा शेतकऱ्यांनी केली आहे.