नुकसान ४० हजार, भरपाई फक्त १ हजार; शेतकऱ्याने शासनाला परत केली रक्कम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2022 01:25 PM2022-11-05T13:25:41+5:302022-11-05T13:37:06+5:30

गतवर्षीच्या गारपिटीची मिळाली एक हजार रुपये मदत

crop damage worth thousands, compensation only 1 thousand; The farmer returned the amount to the government | नुकसान ४० हजार, भरपाई फक्त १ हजार; शेतकऱ्याने शासनाला परत केली रक्कम

नुकसान ४० हजार, भरपाई फक्त १ हजार; शेतकऱ्याने शासनाला परत केली रक्कम

googlenewsNext

विरली (भंडारा) : गतवर्षी रब्बी हंगामात झालेल्या गारपिटीची तब्बल वर्षभराने नुकसानभरपाई मिळाली. मदतीच्या नावाखाली केवळ एक हजार रुपये बँक खात्यात जमा झाले. मोठे नुकसान होऊनही तुटपुंजी मदत पाहून शेतकऱ्याचा संताप अनावर झाला. त्याने गुरुवारी एक हजार रुपये लाखांदूर तहसील कार्यालयाच्या बँक खात्यात जमा करून शासनाला परत केले.

लाखांदूर तालुक्यातील किरमटी येथील जयपाल प्रकाश भांडारकर, असे या व्यथित शेतकऱ्याचे नाव आहे. ते लाखांदूर तालुक्यातील किरमटी येथील रहिवासी आहेत. त्यांची गट क्र. ६२/२ मध्ये ०.४० हेक्टर शेती आहे. गतवर्षी रब्बी हंगामात लाखांदूर तालुक्यात गारपीट झाली. शेकडो शेतकऱ्यांसह जयपाल यांच्या शेतातील पिकांचे गारपिटीने मोठे नुकसान झाले. शासनाने गारपीटग्रस्तांना मदत घोषित केली.

महसूल व कृषी विभागाने सर्वेक्षण करून अहवाल सादर केला. मदतीच्या यादीत जयपाल यांचेही नाव होते. भरपाई मिळण्यास वर्ष उलटले. रक्कम खात्यात जमा झाली. किती? तर केवळ १ हजार रुपये. ही तुटपुंजी रक्कम पाहून भांडारकर उद्विग्न झाले. त्यांनी मिळालेली मदत शासनाला परत करण्याचा निर्णय घेतला व लाखांदूर तहसील कार्यालय गाठून शासनाच्या बँक खात्यात एक हजार रुपये जमा केले. एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर लाखांदूर तहसीलदार वैभव पवार यांची भेट घेऊन निवेदन दिले.

भांडारकर यांची ही भूमिका सध्या सध्या चर्चेचा विषय झाली आहे. भांंडारकरशिवाय अनेक शेतकऱ्यांना अशीच एक-दोन हजार रुपये भरपाई मिळाली आहे.

शेतात लावलेल्या ०.४० हेक्टरमधील हरभरा पिकाचे गारपिटीने पूर्णत: नुकसान झाले. लागवडीचा खर्चही निघाला नाही. पंचनामा कमी क्षेत्राचा दाखविल्याने तुटपुंजी रक्कम मदत म्हणून मिळाली. त्यामुळे मी ती परत केली.

- जयपाल प्रकाश भांडारकर

Web Title: crop damage worth thousands, compensation only 1 thousand; The farmer returned the amount to the government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.