पीक करपले अन् कुंकू हरपले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 05:00 AM2021-03-19T05:00:00+5:302021-03-19T05:00:45+5:30
जिल्ह्यातील मृत्यू पावलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या संदर्भात माहिती घेतली असता ज्वलंत वास्तव समोर आले. २००१ पासून ते फेब्रुवारी २०२१ पर्यंत ५७४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यापैकी ३२२ प्रकरणे अपात्र ठरली आहेत. २०१९ मध्ये १५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. त्यापैकी सात प्रकरणे पात्र तर आठ प्रकरणे अपात्र ठरविण्यात आली. या सातही शेतकऱ्यांना मदत मिळाली आहे. मात्र २०२० मध्ये दहा शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्यापैकी चार प्रकरणे अपात्र असून या सहा प्रकरणे चौकशीकरिता आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्यात धान उत्पादक शेतकऱ्यांची मोठी संख्या आहे, मात्र गत दोन दशकांत सततची नापिकी व कर्जबाजारीपणामुळे कंटाळून जिल्ह्यातील ५७४ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. यापैकी फक्त २४६ शेतकऱ्यांना निकषांमध्ये पात्र ठरवून त्यांना मदत देण्यात आली आहे. उल्लेखनीय म्हणजे २०२० या कोरोना संकट काळात दहा शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. त्यापैकी अजूनपर्यंत एकाही कुटुंबाला मदत मिळालेली नाही.
जिल्ह्यातील मृत्यू पावलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या संदर्भात माहिती घेतली असता ज्वलंत वास्तव समोर आले. २००१ पासून ते फेब्रुवारी २०२१ पर्यंत ५७४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यापैकी ३२२ प्रकरणे अपात्र ठरली आहेत.
२०१९ मध्ये १५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. त्यापैकी सात प्रकरणे पात्र तर आठ प्रकरणे अपात्र ठरविण्यात आली. या सातही शेतकऱ्यांना मदत मिळाली आहे. मात्र २०२० मध्ये दहा शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्यापैकी चार प्रकरणे अपात्र असून या सहा प्रकरणे चौकशीकरिता आहेत. या सहापैकी अजूनही कुणालाच मदत मिळालेली नाही. घरातील कर्ता व्यक्ती अचानक निघून गेल्याने हलाखीच्या परिस्थितीत सदर कुटुंब वास्तव्यास आहेत. लाखांदूर तालुक्यातील विरली बु. येथे महिन्याभरातच बाप-लेकाचा मृत्यू झाला. आता घरात फक्त सुन आणि सासू आहेत. नियतीचा हा काळा घाला असह्य वेदना देणारा ठरला. साकोली तालुक्यातील कुंभली येथे भेंडारकर कुटुंबियाची अवस्था बिकट आहे. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंब आज अत्यंत हालाखीच जीवन जगत आहेत. त्या आधाराची गरज आहे.
आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबांची आपबिती
सव्वा महिना झाला, पती गेले. अजुनही मदत मिळाली नाही. मजुरीचे काम करून प्रपंच सुरू आहे. लहान मुलगा व आई-वडील असा परिवार आहे. नियतीने सर्वस्व हिरावले आता करावे काय.
- काजल भेंडाराकर, कुंभली
पतीने आत्महत्या केल्यानंतर शासन व लाेकप्रतिनिधींकडून जी मदत मिळावयास हवी हती, ती मिळाली नाही. मोलमजुरी व शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवित आहे.
- कमला शेंडे, कोसरा,ता.पवनी
महिन्याभरात माझे धनी आणि पोटचा गोळा काळाने हिरावला. सासू व मी दोघेच आहोत. काय करावे अन् काय नाही, सुचत नाही. पाणावलेल्या डो्ळ्यांनी मदतीची अपेक्षा करूनही आता उपयोग काय? वेळीच मदत मिळाली असती तर आज माझे कुंकु शाबूत असते. आर्थिक टंचाइने होत्याचे नव्हते केले.
-जिजाबाई चुटे, विरली, बु. (ता. लाखांदूर)