कोट्यवधींची अफरातफर; फरार आरोपीला पकडले हिंगणघाटमधून

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2023 02:06 PM2023-08-14T14:06:31+5:302023-08-14T14:07:18+5:30

पवनी तालुक्यातील प्रकार : आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई

crores of fraud in pawni tehsil; Police succeeded in nabbing the fugitive accused | कोट्यवधींची अफरातफर; फरार आरोपीला पकडले हिंगणघाटमधून

कोट्यवधींची अफरातफर; फरार आरोपीला पकडले हिंगणघाटमधून

googlenewsNext

पवनी (भंडारा) : आसगाव (चौ.) येथील सेंट्रल बँकेचे ग्राहक सेवा केंद्र चालविणाऱ्या फरार भामट्याला पकडण्यात दोन वर्षांनंतर पोलिसांना यश आले. ही कारवाई आर्थिक गुन्हे शाखा भंडारा पथकाने शनिवारी केली. प्रमोद हरिश्चंद्र पडोळे (रा. हिंगणघाट) असे अटक करण्यात आलेल्या भामट्याचे नाव आहे.

आसगाव (चौरास) येथील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून मिळालेल्या ग्राहक सेवा केंद्रातर्फे प्रमोद पडोळे याने ग्राहकांची करोडो रुपयांची लूट केल्याचा प्रकार घडला होता. सन २०१८ ते २०२१ पर्यंत आरोपीने बँक शाखेतच बसून बँकेअंतर्गत येणाऱ्या ग्राहक सेवेच्या सर्व कामांच्या माध्यमातून आर्थिक अपहार करून कोट्यवधी रुपयांची लूट केली असल्याचा प्रकार घडला होता.

अनेकांनी जनधन, बचत ठेव खाते किंबहुना बँकेअंतर्गत ग्राहक सेवेची येणारी सर्व कामे पडोळे करीत असल्याने ग्राहकांचा विश्वास निर्माण झाला होता. याचा उपयोग त्याने पुरेपूर ग्राहकांच्या पैशावर डल्ला मारण्यासाठी केला. पडोळे याने ग्राहकांच्या बचत खात्यातूनही पैसे काढण्याचा डाव साधत अनेकांची खाती रिकामी केली. प्रकरणाची तक्रार पोलिस ठाणे पवनी येथे दाखल करण्यात येऊन गुन्ह्याची नोंद करण्यात आली.

पवनी पोलिसांकडून आर्थिक गुन्हे शाखा भंडारा यांच्याकडे प्रकरण वर्ग करण्यात आले. आरोपी दोन वर्षांपासून फरार होता. तपास यंत्रणेने तपासाची चक्रे फिरवून आरोपीच्या नातेवाइकांवर करडी नजर ठेवली. पडोळेची पत्नी एक-दोन महिन्यांतून हिंगणघाटला जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना लागताच सापळा रचण्यात आला. तसेच प्रमोद पडोळेला जेरबंद करण्यात आले. शनिवारी पवनी येथे आणण्यात आले. न्यायालयाने १४ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक लोहित मतानी, अप्पर पोलिस अधीक्षक कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक गणेश पिसाळ, पोलिस हवालदार लुळेकर, शहारे, गोसावी, महिला पोलिस अंमलदार मारबते यांनी केली.

बँक कर्मचाऱ्यांचेही पाठबळ!

जनतेच्या वेळेची बचत व होणारा त्रास कमी करून सुलभ व्यवस्था देण्याच्या हेतूने सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे ग्राहक सेवा केंद्र आसगाव (चौ.) परिसरात तीन ठिकाणी उघडण्यात आले होते. यात मांगली (चौ.), खैरी (दिवाण) व वलनी (चौ.) या गावांचा समावेश होता. मांगली (चौ.)चा केंद्र संचालक प्रमोद पडोळे बँकेच्या आसगाव शाखेत काउंटर लावून बसायचा. खातेदारांनी त्याला बँकेचा कर्मचारी समजून विश्वासाने व्यवहार केला. अनेकांची एफडी रक्कमदेखील विश्वासाने भामट्याकडे बँकेत ठेवण्यासाठी देण्यात आली. काहींना शाखा नसलेल्या गावाच्या नावाचे प्रमाणपत्र देण्यात आले, तर काहींना वेठीस धरण्यात आले. यासाठी बँकेतील कर्मचाऱ्यांचेही पाठबळ असल्याचा ठपका आहे.

जप्त केला मुद्देमाल

पडोळे याला पकडल्यानंतर त्याने उपयोगात आणलेल्या साहित्यावरदेखील जप्तीची कारवाई करण्यात आली. यात लॅपटॉप, बायोमेट्रिक मशिन, डी. जि. पे मशिन, प्रिंटर इत्यादी मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. यातील डेटा फॉरेन्सिक लॅबला संशोधनासाठी पाठविणार असल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक गणेश पिसाळ यांनी दिली.

Web Title: crores of fraud in pawni tehsil; Police succeeded in nabbing the fugitive accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.