गरदेव यात्रेत उसळला भाविकांचा जनसमुदाय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2018 10:25 PM2018-03-03T22:25:32+5:302018-03-03T22:25:32+5:30
१५० वर्षाची जत्रेची परंपरा कायम ठेवण्यासाठी नेरला ग्रामस्थ व ग्रामपंचायतीने पुढाकार घेतला.
विशाल रणदिवे/मुखरू बागडे ।
आॅनलाईन लोकमत
अड्याळ/पालांदूर: १५० वर्षाची जत्रेची परंपरा कायम ठेवण्यासाठी नेरला ग्रामस्थ व ग्रामपंचायतीने पुढाकार घेतला. सहा महिण्यापूर्वीपासूनच गरदेव खांबाच्या बांधकामाला सुरुवात केली. यासाठी साडेतीन लाखांची लोकवर्गनी ज़मा केली. यातून गरदेव खांब उभारल्यात आल्यामुळेच नेरला गावातील गरदेव यात्रेची परंपरा मात्र कायम राहिली.
आधीसारखे जंगल राहिले नाही आणि त्यामुळे गरदेवासाठी लागणारे मजबुत व लांब खांब सुध्दा मिळत नसल्यामुळे नेरला ग्रामस्थ तसेच पंच कमेटीने सिमेंट खांब उभारण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी ग्रामस्थांनी मिळेल तेवढी लोकवर्गणी गोळा केली. गरदेव यात्रेदरम्यान गावाला जत्रेचे स्वरुप आले होते. तीस ते चाळीस गावातील ग्रामस्थ ही गरदेव यात्रा बघायला येतात. या गावातील गरदेव यात्रा ही धुलीवंदनाच्या दिवशी होत असली तरी गावात कुणीही रंग खेळत नाही, हे विशेष. गरदेव यात्रेदरम्यान या गावातील ग्रामस्थ तसेच यात्रेत येणारा कुठलाही ग्रामस्थ मात्र ही परंपरा आजही कायम ठेवतांना दिसतात. नेरला गावातील गरदेव यात्रा दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी धुलीवंदनाच्या दिवशी उत्साहात पार पडली. यात्रेदरम्यान कुठलाही अनुचीत प्रकार घडू नये म्हणून ग्रामपंचायत सरपंच अनिल कोदाणे यांनी आधीच पोलिस बंदोबस्त मागितला. मागील वर्षीपेक्षा यावर्षी यात्रेत येणाºयांची संख्या मात्र जास्ती होती. यात्रेतील भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. गरदेव यात्रेचे आजही ग्रामीण भागात महत्व आहे. श्रध्दा व विश्वास आजही कायम बघायला मिळते. गावातील प्रत्येक घरात आठवडापूर्वीच गरदेव यात्रा व दर्शनासाठी पाहुणे मंडळी येणे सुरु होते. त्यामुळे या दिवशी मुलगा-मुलगी पाहणे, लग्न कार्यजोडणे यानिमित्ताने होते. यासाठी नेरला ग्रामवासीय, गरदेव भक्तांनी यात्रेसाठी पुढाकार घेतला.
पालांदुरात खंडोबा रायाच्या ‘ऊदो-ऊदो’ चा गजर
पालांदूर चौ. : फाल्गुन पौर्णिमा अर्थात होळी म्हणजे आनंदाची पर्वणीच. हिंदू संस्कृतीत होळी व धुळवडीला विशेष महत्व आहे. पौराणीक महाराष्टÑाच्या संस्कृतीत प्रत्येक सणाला विशेषत्व असते. दुर्गुणांची होळी करी सद्गुणांची पेरणी असा हा आनंदोत्सवाचा सण म्हणजेच होळी. होळीचा पाडवा म्हणजे रंगपंचमी, रंगपंचमी म्हणजे विविध रंगाची उधळण करीत विविधतेत एकता निर्माण करुन गुण्यागोविंदाने समाजमन फुलविण्याचा प्रामाणिक प्रयत्नांचा सण. सकाळच्या सत्रात रंग उधळून मौजमजा करायची. दुसºया सत्रात गावातच गरदेव यात्रेत सहभागी होवून गोडगाठी एकमेकांना देत शुभेच्छांचा वर्षाव करायचा, म्हणजे शिमगा सण साजरा करायचा. पालांदुरात दुसºया सत्रात गरदेव यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. जेष्ठ मंडळी गरदेव यात्रेत एखाद्या झाडाखाली मोकळ्या जागेत बसून संभाव्या वरवधू, पिकपाणी, सुखदु:ख या विषयात चर्चेचे गुऱ्हाळ मांडतात. काही गावात भजनीमंडळी रंग उत्सवादरम्यान उत्कृष्ठ भजन गात रोज बक्षीस मिळवून त्या मोबदलयात रात्रीला पानदानाच नियोजन करतात. यातून सलोखा टिकून एकमेकांविषयी आपुलकी वाढिचे मोठे महत्व तयार झाले आहे. गरदेव यात्रेत पुजारी मनोभावे गरदेवाची पुजा करुन पारंपारिक वाद्य डहाके वाजवीत लोकगीताची झलकार सादर करुन रोख बक्षीस मिळवितात. खंडोबा देवाचे नाव घेत बक्षीस दात्यांचे नाव विविध अलंकाराने सजवून त्यांचा सन्मानाने उल्लेख करतात. दुपारी ३ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत ही गरदेव यात्रा शांततेत पार पडली. गावकऱ्यांनी सार्थ हजेरी लावीत जत्रेचा आनंद द्विगुणीत केला. यात्रेतून छोट्या-मोठ्या व्यावसायीकांना अर्थार्जन झाले.