परसोडी नाग येथे उसळणार भाविकांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2019 10:40 PM2019-08-04T22:40:22+5:302019-08-04T22:40:37+5:30
पवित्र नागभूमी म्हणून प्रसिद्ध असलेल्या लाखांदूर तालुक्यातील परसोडी नाग येथे सोमवारला नागपंचमी निमित्ताने हजारो भक्तांची गर्दी उसळणार आहे. या गावाला यात्रेचे स्वरूप आल्याचे मागील अनेक वर्षापासुन दिसून येत आहे. दरवर्षी नागपंचमीला परसोडी नाग येथे तालुक्यातील व परीसरातील हजारो भाविक पुजा अर्चनासाठी येत असतात.
लोकमत न्यूज नेटवर्क
लाखांदुर : पवित्र नागभूमी म्हणून प्रसिद्ध असलेल्या लाखांदूर तालुक्यातील परसोडी नाग येथे सोमवारला नागपंचमी निमित्ताने हजारो भक्तांची गर्दी उसळणार आहे. या गावाला यात्रेचे स्वरूप आल्याचे मागील अनेक वर्षापासुन दिसून येत आहे. दरवर्षी नागपंचमीला परसोडी नाग येथे तालुक्यातील व परीसरातील हजारो भाविक पुजा अर्चनासाठी येत असतात.
दरवर्षी येथे यात्रा भरत असल्याने स्थानिक लोकांना रोजगार ही या माध्यमातून मिळत आहे. सदर स्थळ पर्यटन व तिर्थस्थळ म्हणून विकसीत करण्याची गरज असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.
सापाचे विषही होते निष्प्रभ!
विरली बु. : परसोडी (नाग) येथील नागमंदिरात सर्पदंशाच्या अनेक रुग्णांना जीवनदान मिळाले असून सापाचे विष निष्प्रभ करण्याची या मंदिराबाबत आख्यायिका कायम आहे. नागपंचमीनिमित्त या मंदिरात भव्य यात्रेचे परिसरातील हजारो भाविक आपापल्या गावातील दिंड्यासह सहभागी होऊन नागदेवतेचे दर्शन घेतात. यावर्षी जुलै महिन्यापासून आजपर्यंत या नागमंदिरात १२ रुग्णांवर उपचार करण्यात आले. त्यापैकी ९ रुग्ण सुदृढ होऊन परत गेले. तर विश्वनाथ उके (२५) भागडी, अर्जुन मेश्राम (४७) अत्री, सुनीता वरठी (४०) साकोली या तीन रुग्णांवर उपचार सुरु आहेत. अशी माहिती नागमंदिर देवस्थानचे अध्यक्ष विठ्ठल मेहंदळे यांनी दिली.
नागठाणा येथे नागपंचमी
उसर्रा : नागराजस्वामी देवस्थान नागठाणा येथे समिती व गावकऱ्यांच्या वतीने उद्या नागपंचमी निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात नागपूजा, ध्वज आदी कार्यक्रम होणार असून याचा लाभ घेण्याची विनंती आयोजकाकडून करण्यात आली आहे.
जनजागृती आवश्यक
समाजात आजही सापांबद्दल अनेक चुकीचा समज व्याप्त आहे. त्यामुळे सापांबद्दल जनजागृती आवश्यक आहे. अर्धेपेक्षा जास्त सापाच्या प्रजाती या बिनविषारी असतात. सर्पदंश झाल्यावर कोणत्या सापाने दंश केला याची माहिती नसते. परिणामी भीतीमुळेच रुग्णावर मानसिक परिणाम होतो.