‘हरहर महादेव’च्या गजरात भाविकांची अलोट गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 11:03 PM2018-02-13T23:03:18+5:302018-02-13T23:03:50+5:30
महाशिवारात्रीनिमित्त जिल्ह्यातील शिवमंदिरात दर्शनासाठी आज भाविकांची मोठी गर्दी उसळली होती.
आॅनलाईन लोकमत
भंडारा : महाशिवारात्रीनिमित्त जिल्ह्यातील शिवमंदिरात दर्शनासाठी आज भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. प्रत्येक मंदिर परिसरात जिल्हा व पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता. येणाऱ्या श्रद्धाळूंसाठी पिण्याच्या पाण्याची व महाप्रसादाची व्यवस्था प्रशासन व सेवाभावी संस्था, मंडळ तथा राजकीय पक्षांकडून केली होती. जिल्ह्यातील प्रत्येक मंदिराकडे जाणाऱ्या भाविकांच्या जत्थातून हर हर महादेवांचा जयघोष करण्यात येत होता.
पालांदूर : महाशिवरात्रीच्या पर्वावर किटाडी येथील बालाजी शिवमंदिरात महायात्रेचे आयोजन हर्षोल्हासात पार पडले. यात्रेला शिवभक्तांची गर्दी उसळली होती.
अगदी सकाळी शिवशंभूची विधिवत पंचामृतांनी आंघोळ करीत नवे वस्त्र परिधान करण्यात आले. पाच जोडप्यांनी शास्त्रशुद्ध पद्धतीने पूजा व महाआरती करून भक्तांना दर्शनाकरिता मंदिर खुले केले. भूमेश्वरी खंडाईत, वैशाली खंडाईत, देवकन बेंदवार, गीता नागलवाडे, शालीनी प्रधान, वंदना गिऱ्हेपुंजे यांनी शिवशंभूला माल्यार्पण करून दैनंदिन पुजारी व महाभिषेक करणारे पुजारी, पंडीत यांना वस्त्रदान करीत शिवशंभूना नमन केले. महाप्रसादाचे नैवैद्य दाखवित भक्तांना महाप्रसाद देण्यात आले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य भरत खंडाईत, माजी सरपंच धनंजय घाटबांधे, सरपंच देवकन बेंदवार, माजी सरपंच वैशाली खंडाईत, बालाजी समिती सदस्य उद्धव मासूरकर उपस्थित होते. भक्तगणांना गडावर पिण्याच्या पाण्याकरिता बंडू पुस्तोडे, शेखर घाटबांधे यांनी ट्रॅक्टरने पाणी पुरवठा केला. प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य सेवा पुरविण्यात डॉक्टरांची चमू रुग्णवाहिकेसोबत सज्ज होते. भरत खंडाईत व भूमेश्वरी खंडाईत भक्तांना महाप्रसादाचे वाटप करीत होते. महाप्रसादाला लेखराम चौधरी, पंकज घाटबांधे, लेखराम नान्हे, मुरलीधर गजबे, किशोर मेश्राम, लिलाधर भुजाडे, शामा बेंदवार, रमेश हटवार सहकार्य केले.
भक्तगणही रांगेतून महाप्रसाद घेत सहकार्य करीत होते. ठाणेदार अंबादास सुनगार, पोलीस हवालदार कचरु शेंडे, भोजराज भलावी, पोलीस शिपाई पियुष बाच्छल व होमगार्ड चमू भक्तांना रांगेतून दर्शनाकरिता सहकार्य केले. सकाळसत्रात पावसाच्या भीतीने गर्दी नव्हती. मात्र दुपारसत्रात भक्तांची गर्दी उसळली. यात्रेत दुकानांची रस्त्याच्या दुतर्फा सुसज्ज व्यवस्था केली असल्याने भक्तांना त्रास झाला नाही. रात्रभराच्या पावसाने रस्त्यावरील धुळ नष्ट झाल्याने पायी नागवळणी रस्ता, गड चढताना अत्यानंद भक्तगणात जाणवत होता. बालाजी शिवमंदिरावर निसर्गाने मुक्तहस्ताने सौंदर्याची उधळण केल्याने बालाजी शिवमंदिर विशेष खुलून दिसत होते. उंच उंच झाडे लहान मोठे कोरडे ओढे व त्यात असलेली बारीक रेती, अत्यंत शुभ्र दगड दुधाळ वाऱ्याने झाकलेले आच्छादन, माकड, हरिण, ससे यांचे दर्शनाने भाविक अत्यंत प्रसन्नचित्ताने ७ कि.मी.च्या वनराईतून पायी प्रवास अविस्मरणीय ठरला आहे. हर हर महादेवचा गजर करीत पोहा निघाला महादेवा म्हणत शिवभक्त अत्यंत प्रसन्न जाणवत होते. जि.प. सदस्य वर्षा रामटेके, पंचायत समिती सदस्य वंदना गवळे शिवभक्तांना नमन करीत शुभेच्छा देत होते. आदल्या दिवशी सोमवारला माजी खा. नाना पटोले व जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे यांनी महादेवाचे दर्शन घेत व्यवस्थेची चौकशी करीत उत्कृष्ट सेवेकरिता सहकार्य केले. बालाजी शिवमंदिर समितीचे पदाधिकारी किटाडी, मांगली, पालांदूर येथील शिवभक्त भक्तांच्या सेवेत समर्पीत केले होते हे विशेष.
साकोली तालुक्यात हरहर महादेवाचा गजर
साकोली : हरबोला हर हर महादेवच्या गजराने संपूर्ण साकोली तालुका दुमदुमला असून गावोगावी शिवमंदिरात शिवभक्तांनी हजेरी लावून भगवान शंकराची पूजाअर्चा केली. गेल्या काही वर्षापासून साकोली तालुक्यात बऱ्याच ठिकाणी शिवरात्रीला महादेवाची यात्रा भरु लागल्या आहेत. तर जुन्या असलेल्या यात्रास्थानांना भरतीचे दिवस आले आहेत. पचमढीचा मोठामहादेव तर प्रतापगडचा (पूर्वी साकोली तालुका) हा छोटा महादेव म्हणून प्रसिद्ध असले तरी सध्या साकोली जवळील गडकुंभली पहाडीवर शिवमंदिरात चांगलीच मोठी यात्रा भरते. सकाळपासूनच शिवपिंडीचे दर्शन घेण्यास भाविकांची रिघ लागली होती. ही यात्रा दोन दिवस चरम सिमेवर असते. तिसºया दिवशी यात्रेचे समापन होते. तालुक्यातील मोठा महादेव म्हणून याची गणती आहे. जवळील तुडमापूरी येथे जंगल परिसरातील गडबड्या महादेवाला, परिसरातील भाविकांची गर्दी झाली होती. तर वलमाझरी, उमरी, परसोडी पहाडीवरील शिवमंदिरातही मोठ्या संख्येने भाविकांनी हजेरी लावली होती. शिवणटोला येथील पोंगेझरी, वटेटेकर येथील वटेश्वर महादेव, शंकरपूर सिंदीपार येथील मोठा महादेव, श्रीनगर कालोनीवरील पहाडीवरील शिवदुर्गा मंदिर परिसर हे भक्तांच्या गर्दीने फुलून गेले होते. सर्व मंदिरामध्ये दिवसभर यज्ञ, प्रवचन, कीर्तन, अभिषेक आदी विविध धार्मीक कार्यक्रम सुरु होते. उद्या पारण्यानिमित्त काही शिवमंदिरात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. गडकुंभली पहाडीवर सुनिल फुंडे यांच्याकडून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
महाकालेश्वर मंदिरात शिवरात्री कार्यक्रम
भंडारा : गणेशपूर येथील वैनगंगा नदीतिरावरील महाकालेश्वर मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. मागील १८ वर्षांपासून या मंदिरात भाविक मोठ्या श्रद्धेने उपस्थित होऊन महाप्रसादाचा लाभ घेतात. दरम्यान दोन दिवसीय या कार्यक्रमात भजन, कीर्तन, दहिहांडी आदी धार्मिक कार्यक्रम घेतल्या जातात. कार्यक्रमाला गणेशपूरवासीय सहकार्य करतात.