गोसेखुर्द येथे वाढली पर्यटकांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2019 06:00 AM2019-11-04T06:00:00+5:302019-11-04T06:00:36+5:30
पुर्व विदर्भातील अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणून गोसीखुर्दची राज्यभर ओळख झाली आहे. भव्य आकाराचे ३३ वक्रदार असलेल्या प्रकल्पात मोठा जलसाठा पाहून पर्यटकांना आनंद होतो. मातीची पाळ व गार्ड वॉल वरून प्रकल्पाचे छायाचित्र मोबाईल कॅमेरात बंद करुन डोळ्यात साठवून ठेवतात.
लोकमत न्यूज नेटवर्क
पवनी : तालुक्यातील पर्यटन स्थळांच्या तुलनेत राष्ट्रीय प्रकल्प गोसीखुर्दला पर्यटकांची प्रथम पसंती आहे. रविवारी व अन्य सार्वजनिक सुट्टी असतांना हजारोंच्या संख्येने पर्यटक प्रकल्प स्थळी भेट देत आहेत. पर्यटकांची गर्दी होत असतांना सुविधांचा अभाव असल्याची जाणीव होते.
पुर्व विदर्भातील अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणून गोसीखुर्दची राज्यभर ओळख झाली आहे. भव्य आकाराचे ३३ वक्रदार असलेल्या प्रकल्पात मोठा जलसाठा पाहून पर्यटकांना आनंद होतो. मातीची पाळ व गार्ड वॉल वरून प्रकल्पाचे छायाचित्र मोबाईल कॅमेरात बंद करुन डोळ्यात साठवून ठेवतात. थकवा आल्यावर एकमेव असलेल्या झाडाखाली बसून गप्पा मारतात. पर्यटकांना अन्य पर्याय उपलब्ध नाही. अतिथी गृह नाही, रेस्टॉरंट नाही, बगीचा किंवा उद्यान नाही, शौचालय नाही. पर्यटन स्थळी आवश्यक असलेल्या कोणत्याही सुविधा प्रकल्पाचे परिसरात उपलब्ध नाहीत. जिल्ह्यातील पर्यटकांना ही माहिती आहे. त्यामुळे ते पुरेशा तयारीनिशी येतात. परंतु शंभर किमीपेक्षा जास्त अंतरावरुन येणारे पर्यटक प्रकल्प परिसरातील गैरसोयी पाहून खंत व्यक्त करतात. प्रकल्पाचे परिसरात पर्यटकांसाठी कोणत्याही सुविधा उपलब्ध करण्याचा प्रयत्न जलसंपदा विभागाने केलेला नाही. पर्यटकांची गर्दी पाहून सुविधांचा विचार व्हावा अशी अपेक्षा पर्यटक व्यक्त करतांना दिसत आहेत.