कामगार नोंदणीच्या गर्दीत दोघे बेशुद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2019 09:45 PM2019-03-05T21:45:40+5:302019-03-05T21:46:05+5:30
अटल विश्वकर्मा सन्मान योजनेंतर्गत कामगारांच्या नोंदणीसाठी तुमसर पंचायत समिती परिसरात प्रचंड गर्दी झाली असून या गर्दीत उन्हाच्या दाहकतेने दोघे जण बेशुद्ध पडल्याची घटना मंगळवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : अटल विश्वकर्मा सन्मान योजनेंतर्गत कामगारांच्या नोंदणीसाठी तुमसर पंचायत समिती परिसरात प्रचंड गर्दी झाली असून या गर्दीत उन्हाच्या दाहकतेने दोघे जण बेशुद्ध पडल्याची घटना मंगळवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास घडली.
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने तालुकास्तरावर कामगार नोंदणीचा कार्यक्रम भंडारा जिल्ह्यात सुरु आहे. प्रथम जिल्हास्तरावर नोंदणी कार्यक्रम घेण्यात आला. परंतु प्रचंड गर्दीमुळे तालुकास्तरावर कामगार नोंदणी सुरु करण्यात आली. येथील पंचायत समिती परिसरात कामगारांनी नोंदणीसाठी मोठी गर्दी केली आहे .मंगळवारी दुपारी महिला व पुरुषांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. उन्ह चांगलेच तापत होते. या गर्दीत उन्हाच्या तडाख्याने सीतेपार येथील श्रीराम चुधरे या कामगाराला भोवळ आली. तो बेशुद्ध पडला. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी प्रमिला होती.
या प्रकाराने त्याही घाबरल्या आणि त्याही बेशुद्ध होऊन पडल्या. यामुळे तुमसर पंचायत समिती परिसरात एकच खळबळ उडाली. नाव नोंदणीसाठी आलेल्या कामगारांनी रोष व्यक्त केला. सरपंच संघटनेचे अध्यक्ष गजानन लांजेवार, पंचायत समिती सदस्य हिरालाल नागपुरे यांनी पंचायत समिती कार्यालयात धाव घेतली. या दोघांवर उपचार करण्यात आले. तुमसर येथील पंचायत समितीत होणारी गर्दी टाळण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर नोंदणी करावी अशी मागणी कामगारांनी केली.