अँटिजेन चाचणीसाठी ग्रामीण रुग्णालयाकडे नागरिकांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:36 AM2021-04-20T04:36:34+5:302021-04-20T04:36:34+5:30
सध्या जिल्ह्यात कोरोना महामारीचे संकट वाढले असून, शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात कोरोना झपाट्याने पसरत आहे. याशिवाय मृत्यूचे ...
सध्या जिल्ह्यात कोरोना महामारीचे संकट वाढले असून, शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात कोरोना झपाट्याने पसरत आहे. याशिवाय मृत्यूचे प्रमाणही वाढले असल्याने ग्रामीण भागातील नागरिक धास्तावले आहेत. त्यामुळे अँटिजेन टेस्टसाठी ग्रामीण रुग्णालयाकडे नागरिकांनी धाव घेतली असून, ग्रामीण रुग्णालयात अँटिजेन टेस्टच्या पुरेशा कीट उपलब्ध नसल्याचे कारण सांगून नागरिकांना आल्यापावली परत जावे लागत असल्याचा प्रकार असाच सोमवारी मोहदुरा ग्रामीण रुग्णालयात आला आहे. याबाबत नागरिकांनी आरोग्य अधिकारी यांच्याकडे विचारपूस केली असता आम्हाला अँटिजेन टेस्टसाठी केवळ २५ कीट उपलब्ध झाल्या असून, मागील काही शिल्लक कीट असल्यामुळे जवळपास ५० टेस्ट करण्यात आल्या. त्यानंतर कीट नसल्यामुळे नागरिकांना परत करावे लागल्याचे सांगितले. मात्र, रुग्णालयातील काही कर्मचाऱ्याच्या ओळखीच्या लोकांना टेस्टकरिता वेगळे थांबवून ठेवले व आम्हाला कीट संपल्याचे कारण सांगून परत केल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. कीट कमी होत्या तर आमच्याकडून रजिस्ट्रेशन शुल्क का घेतले, असा सवाल नागरिकांनी केला आहे. यासोबतच ग्रामीण भागातील वाढती कोरोनाबाधित रुग्णसंख्या लक्षात घेता जास्तीत जास्त कीट ग्रामीण रुग्णालयांना उपलब्ध करून देण्याची नागरिकांची मागणी आहे.