बँकेच्या दारात ग्राहकांची झुंबड, बंद दारात कर्मचाऱ्यांचे कामकाज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:21 AM2021-07-23T04:21:41+5:302021-07-23T04:21:41+5:30
सिहोऱ्यात राष्ट्रीयीकृत एकमेक बॅँक ऑफ इंडियाची शाखा आहे. परिसरातील ४७ गावांचा आर्थिक व्यवहार याच बॅँकेतून केला जात आहे. सामान्य ...
सिहोऱ्यात राष्ट्रीयीकृत एकमेक बॅँक ऑफ इंडियाची शाखा आहे. परिसरातील ४७ गावांचा आर्थिक व्यवहार याच बॅँकेतून केला जात आहे. सामान्य ग्राहक या बॅँकेतून आर्थिक व्यवहार करीत नसले तरी एक तरी बॅँकेत त्यांचे बचत खाते आहे. घरातील अन्य सदस्यांचे बचत खातेही याच बॅँकेत आहे. यामुळे अनेक शासकीय योजनेत याच बॅँकेचे बचत खाते क्रमांक दिले जात आहेत. शासनाच्या निराधार, संजय गांधी, वृद्धापकाळ, शिष्यवृत्ती योजनांचे खाते याच बॅँकेत अनिवार्य करण्यात आले आहे. यामुळे बॅँकेच्या दारात नेहमी ग्राहकांची झुंबड राहत आहे. थेट राज्य मार्गावर ग्राहकांच्या रांगा लागत आहेत. हजारोंच्या संख्येने बचत खाते असताना आर्थिक व्यवहाराचा आकडा वाढता आहे. रोज शेकडो ग्राहकांचे आर्थिक व्यवहार होत आहेत.
या गर्दीतील ग्राहकांना न्याय देताना कर्मचाऱ्यांची कसरत होत आहे. दोष कर्मचाऱ्यांचा नाही. बॅँकेत आर्थिक देवाणघेवाण करण्याचा एकच काऊंटर आहे. देवाण आणि घेवाण करण्याचे दोन काऊंटर नसल्याने ग्राहकांची गर्दी ताण वाढवित आहे. कोरोना विषाणू संसर्गाचा पादुर्भाव रोखण्यासाठी बॅँकेत एकाच ग्राहकाला आत प्रवेश देण्यात येत असला तरी कर्मचाऱ्यांच्या संपर्कात ग्राहक येत आहेत. यामुळे ग्राहकांना दारातच वेठीस धरणे योग्य नाही. पावसापासून संरक्षण करण्याची उपाय योजना बॅँक प्रशासनाने केली नाही.
पावसात ओलेचिंब होण्याची पाळी ग्राहकांवर येत आहे. दरम्यान, बॅँकेत काही मुजोर कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांची ग्राहकांसोबत असभ्य वर्तणूक होत असल्याने अनेक वेळेस हमरीतुमरी झाली आहे. त्यांच्या विरोधात तक्रारी झालेल्या आहे. परंतु कारवाई झाली नाही. यामुळे मुजोरपणे वागण्याचे मनोबल वाढत आहेत. बॅँकेत कर्मचाऱ्यांचा तुटवडा आहे. यामुळे जलदगतीने कामे होत नाहीत. बॅँकेची एटीएम सेवा सुरू केली आहे. परंतु गर्दी टाळण्यासाठी एटीएम विषयी जनजागृती करण्यात येत नाही. एटीएमसमोर नाली आणि केरकचरा आहे. बॅँक प्रशासनाने स्वच्छ करण्यासाठी पुढाकार घेतला नाही. बॅँक प्रशासनाच्या विरोधात सातत्याने रोष वाढत आहे. राजकीय पुढारी आंदोलनाचे इशारे देत आहेत. बॅँक प्रशासनाच्या विरोधात कधीही पोळा फुटण्याची शक्यता असल्याने लक्ष घालणे गरजेचे आहे.