जमावबंदीत मोहफुलाच्या दारु अड्ड्यांवर गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2020 06:00 AM2020-03-27T06:00:00+5:302020-03-27T06:00:31+5:30
देशी दारुचा पुरवठा करण्यासाठी मोहफुलाची चोरटी वाहतूक आधंळगाव पोलीस ठाणे हद्दीत केली जात आहे. मोहफुलापासून दारु तयार करण्यासाठी मोहाडी तालुक्यातील नदी तिरावरील गावांचा समावेश राज्य बंदी काळात आश्चर्याची बाब ठरत आहे. सर्वत्र जिल्ह्यात जमावबंदी आदेश असताना अवैध दारु अड्डयावर गर्दी कशी असा सवाल सर्वसामान्यांना पडला आहे.तिथे व्हायरस पसरला जात नाही का..? असा प्रश्न नागरिकांकडुन उपस्थित केला जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
आंधळगाव : कोरोना विषाणूच्या संसर्गापासून बचावासाठी २१ दिवसांचा देशव्यापी बंद घोषीत करण्यात आलेला आहे. भंडारा जिल्ह्यासह राज्यस्तरीय सिमाही सिल करण्यात आलेल्या आहेत. त्यात दारु ही जीवनावश्यक बाबीत मोडत नसल्याने त्यावरील बंदी ही मद्यपींची चांगलीच तारांबळ उडविणारी ठरली आहे. मात्र देशी-विदेशी बंदमुळे मोहफुलाच्या दारु अड्ड्यांवर मद्यपींची गर्दी चांगलीच वाढत आहे.
देशी दारुचा पुरवठा करण्यासाठी मोहफुलाची चोरटी वाहतूक आधंळगाव पोलीस ठाणे हद्दीत केली जात आहे. मोहफुलापासून दारु तयार करण्यासाठी मोहाडी तालुक्यातील नदी तिरावरील गावांचा समावेश राज्य बंदी काळात आश्चर्याची बाब ठरत आहे. सर्वत्र जिल्ह्यात जमावबंदी आदेश असताना अवैध दारु अड्डयावर गर्दी कशी असा सवाल सर्वसामान्यांना पडला आहे.तिथे व्हायरस पसरला जात नाही का..? असा प्रश्न नागरिकांकडुन उपस्थित केला जात आहे. सदर अवैध दारू विक्री नेमक्या कुणाच्या आशिवार्दाने हा गोरखधंदा फोफावत आहे ? असे नानाविध प्रश्न निर्माण झाले आहेत. जिल्ह्यातील सिमावर्ती भागात आंधळगाव परिसर वसलेला आहे. सध्या संचार बंदी आहे. मात्र पालेभाज्या व जीवनावश्यक साहित्याची वाहतूक सुरु आहे.
फळभाज्यांची वाहतूक करणाऱ्या चारचाकी पीकअपचा दारू विक्री साठी वापर केला जात असल्याची माहिती समोर आली आहे. येथे ग्रामीण भाग सध्या मोहफुलाच्या दारुचे केंद्र ठरले आहे. आंधळगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील, उसर्रा, जांब, कांद्री, लोहारा, रामपूर, गायमुख, सालेबर्डी व भिकारखेडा, धर्मापुरी आदी गावात मोहफुलाच्या दारुची विल्हेवाट लावली जात आहे. तर काही दुचाकी चालकांच्या सहाय्याने नदीच्या क्षेत्रातील गावात मोहफूलाच्या व दारू पोहचविले जात आहे. आंधळगाव येथे १०० रुपयांत देशी पव्वा, मोहा २० रुपये ग्लास, तर इंग्रजीला तर तोडच नाही, मागेल तोच दर दिला जात आहे., मोहाडी पोलीस ठाण्यात हद्दीत भिकारखेडा , धर्मापुरी मांडेसर येथे तर खुलेआम मोहफूलाची दारू विक्री सुरु आहे. सदर दारूने खरबी व सालई गावातील दोन लोकांचा मृत्यू झाला असल्याची घटना अलीकडच्या काळात घडली आहे. दारुची अवैध दारु विक्री होत असल्याने मोहाडी पोलिस ठाणे व आंधळगाव पोलीस ठाण्याच्या ठाणेदारांना अर्थपुर्ण व्यवहार दारू विक्रेत्यामार्फत केला जात असल्याची चर्चा आता जोर धरत आहे.
इतर गावात मोहफुलाच्या दारूची गळती केली जात आहे. तालुक्यातील ग्रामीणसह शहरी भागात मोहफुलाच्या दारूचे अड्डे सर्रास सुरु आहेत. जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू असतांना नेमक्या कुणाच्या आशिवार्दाने दारुची गळती व विक्री होत आहे, हा नेमका प्रश्न आहे.
येथे ग्रामीण भागात बाहेरील जिल्ह्यातून आलेल्यांच्या वाढत्या संख्येमुळे धास्तावलेल्या ग्रामस्थांना आता मद्यपीमुळे व अवैध दारु अड्ड्यांमुळे संताप आल्याचे चित्र आहे. येथे चोविस तास शहराचे तथा गावागावाची गस्त लावणाºया पोलिस प्रशासनाला याची साधी भनकही कशी लागली नाही, हे विशेष! येथे कोरोनाच्या प्रादूर्भावाने देश हतबल होत असतांना अवैध दारुचे ठेके चालु असणे एका विशिष्ठ विभागाच्या कार्यप्रणालीवर सशंय व्यक्त करणारे ठरत आहे. याकडे आता लक्ष देण्याची गरज आहे.
मेंढा, चांदनी चौक, गणेशपूर येथे दारुड्यांची जत्रा
राज्य शासनाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १३ मार्चपासून लागू केला आहे. या कायद्यांतर्गत भंडारा जिल्ह्यातील सर्व बिअरशॉपी, वाईन शॉप, परमीट रुमबार, रेस्टारेंट, सर्व देशी दारुचे दुकाने १९ मार्चच्या सायंकाळी ५ वाजतापासून बंद केल्याने दारुसाठी मद्यपींची धडपड सुरु आहे. भंडारा शहरातील नेहरु वॉर्ड (मेंढा), चांदणी चौक, गणेशपूर येथे जणू दारुड्यांची जत्राच भरत आहे. त्यामुळे आजारावर नियंत्रण ठेवणे कठीण होणार आहे.