दगडाने ठेचून युवकाचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2016 12:31 AM2016-06-27T00:31:21+5:302016-06-27T00:31:21+5:30
आंतरजातीय विवाह करणाऱ्या २८ वर्षीय युवकाचा मुलीकडील कुटुंबीयांनी दगडाने ठेचून खून केला.
वरठीतील घटना : आंतरजातीय विवाहाचा काढला वचपा
वरठी : आंतरजातीय विवाह करणाऱ्या २८ वर्षीय युवकाचा मुलीकडील कुटुंबीयांनी दगडाने ठेचून खून केला. ही थरारक घटना रविवारी पहाटे २.३० वाजताच्या दरम्यान येथील नेहरु वॉर्डात येथे घडली. सोनू क्रिष्णा मेश्राम असे मृतकाचे नाव आहे. मृतकाच्या पत्नीच्या तक्रारीवरुन एकाच कुटुंबीयातील चार व अन्य एकावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
वरठी येथील सोनू मेश्राम याची भंडारा येथील एका युवकाबरोबर मैत्री होती. त्यामुळे सोनूचे नियमित युवकाच्या घरी जाणे-येणे होते. दरम्यान, सोनू मेश्रामचे युवकाच्या बहिणीसोबत प्रेमसंबंध जुळले. दोघांनीही कुटुंबीयांना न सांगता २३ मे २०१६ रोजी दशबल पहाडी हत्तीडोई येथे बौध्द विहारात गुप्तपणे लग्न केले. लग्नानंतर सदर मुलगी ३१ मेपर्यंत वडिलांच्या घरी राहत होती.
१ जून २०१६ पासुन सोनू व त्याची पत्नी हे वरठी येथील नेहरु वॉर्डातील घरी राहायला आले. मुलीच्या कुटुंबीयांना लग्नाची माहिती मिळाल्यावर त्यांनी लग्नास विरोध केला. अनेकदा मुलीला सोनूपासून वेगळे करण्यासाठी प्रयत्न केला होता. पण प्रेमात मग्न असलेल्या मुलीने सोनूपासून विभक्त होणे मान्य केले नाही.
२५ जून रोजी रात्री ११ वाजताच्या दरम्यान वसीम शेख नामक व्यक्ती सोनूच्या घरी आला व त्याला बाहेर घेऊन गेला. त्यावेळी त्याच्यासोबत हमीद बब्बु शेख (४५), अलीम बब्बु शेख (४२), कलाम बब्बु शेख (४०) रा. बैरागी वाडा भंडारा व तौलीक हमी शेख (२०) रा. गोंदिया होते. सोनू त्यांच्यासोबत बाहेर गेल्यामुळे घरचे सदस्य झोपी गेले. पहाटे २.३० वाजताच्या दरम्यान सोनू रक्ताने भरलेल्या अवस्थेत घरी आला.
सोनूच्या आईने शेजारी राहणाऱ्या त्याचा भाऊ नितीन याला बोलावून त्याला प्राथमिक आरोग्य केंद्र वरठी येथे नेले. गंभीर जखमी असल्यामुळे त्याला भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. दवाखान्यात हलविण्यापर्यंत स्थिती गंभीर झाल्यामुळे त्याला भंडारा येथून नागपूर येथे हलविण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. शवविच्छेदन करुन रविवारी सायंकाळी त्यांच्या पार्थिवावर वरठी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
मृतकाच्या पत्नीच्या तक्रारीवरुन वरठी पोलिसांनी ३०२ अंतर्गत गुन्हा नोंदविला. तपास पोलीस उपनिरीक्षक नारायण सावणे व सहायक पोलीस उपनिरीक्षक तुलाराम गभणे करित आहेत. (वार्ताहर)
दगडाने ठेचल्याचा संशय
सोनूला रात्री ११ वाजता घरुन घेऊन गेल्यानंतर पहाटे २.३० वाजता तो खुनाने माखलेल्या स्थितीत घरी परतला. तीन तास कुठे होता. काय झाले कुणाला माहीत नाही. पण घराबाहेर काही अंतरावर मोठा दगड रक्ताने माखलेला आढळला. त्यामुळे बाचाबाचीदरम्यान त्याच्या डोक्यावर दगडाने ठेचल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला.
‘सैराट’ची पुनरावृत्ती
बहुचर्चित ‘सैराट’ या मराठी चित्रपटातील कथेनुसार यात नायक व नायिकेची हत्या करण्यात येते. चित्रपटातील कहाणीप्रमाणे प्रेमीयुगुलाच्या लग्नानंतर मुलीकडील मंडळीचा विरोध असतो. असाच प्रकार या घटनेतूनही दिसून आला. यात मात्र सुदैवाने नायिका बचावली. या घटनेने पुन्हा एकदा ‘सैराट‘ची पुनरावृत्ती झाल्याची चर्चा आहे.