शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ऍझोला पाणवनस्पतीचे संगोपन करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 10:46 AM2021-06-03T10:46:11+5:302021-06-03T10:47:50+5:30
भंडारा तालुक्यात दहा टक्के रासायनिक खत बचत मोहीम
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : ऍझोला पाणवनस्पती ही बहुगुणकारी वनस्पती असून शेतकऱ्यांनी आपल्या घराशेजारी सावलीमध्ये या पानवनस्पतीचे संगोपन करावे. ही वनस्पती हिरवळीचे खत म्हणून उपयोगात आणता येते. या पाणवनस्पतीच्या पेशीत नत्र स्थिर करणारी ऍनाबीना ऍझोली नावाची नील-हरित शेवाळ वर्गातील वनस्पती वाढत असल्याने शेतकऱ्यांना दुहेरी फायदेशीर ठरत असल्याचे प्रतिपादन भंडारा तालुका कृषी अधिकारी अविनाश कोटांगले यांनी केले.
भंडारा तालुका कृषी विभागातर्फे कृषी सप्ताहानिमित्त दहा टक्के रासायनिक खत बचत मोहिमेअंतर्गत तालुक्यातील शेतकऱ्यांशी ते बोलत होते. भंडारा तालुका कृषी विभागाच्या वतीने तालुक्यातील पलाडी, भिलेवाडा, सिरसी, जाख, शहापूर, खरबी,माटोरा येथे आयोजित उपक्रमांतर्गत शेतकऱ्यांना दहा टक्के खत बचत मोहीम तसेच ऍझोला पानवनस्पतीचे प्रात्यक्षिकातून मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी पहेलाचे मंडळ कृषी अधिकारी होमराज धांडे, भंडारा मंडळ अधिकारी दीपक आहेर, पर्यवेक्षक विजय हुमणे, कृषी अधिकारी कळाम, कृषी सहाय्यक गिरीश रणदिवे, कृषीसेवक भाग्यश्री पडोळे, देवा जवंजाळ यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. कोटांगले यांनी शेतकऱ्यांना ऍझोला ऍझोला कल्चर बनविताना तीन फूट रुंद, दहा फूट लांब, अर्धा फूट खोल टाकी तयार करून त्यामध्ये शेण, माती, सिंगल सुपर फॉस्फेट मिक्स करुन त्या टाक्यामध्ये पाणी भरून ऍझोला कल्चर कसे सोडायचे हे प्रात्यक्षिकातून दाखविले. दर चौरस मीटरला ३०० ग्रॅम ऍझोला ऍझोला धानाच्या बांधीत टाकल्यास दहा ते पंधरा दिवसात त्याची भरघोस वाढ होऊन प्रतिहेक्टरी पाच ते दहा टन ऍझोला तयार होऊन पिकास उपलब्ध होतो. यामुळे युरिया खताची गरज भासत नाही. त्यामुळे अझोला कल्चर हे शेतकऱ्यांना अतिशय फायदेशीर ठरते. मंडळ अधिकारी होमराज धांडे यांनी ऍझोला कल्चर दूध उत्पादक शेतकऱ्यांना कसे फायदेशीर ठरते व त्याचा शेतीसाठी कसा उपयोग होतो हे सांगितले. कृषी सहायक गिरीश रणदिवे यांनी ऍझोलाचे प्रात्यक्षिक दाखवले. संचालन कृषी सहायक गिरीश रणदिवे यांनी केले तर आभार देवा जवंजाळ यांनी मानले.
हवेतील मुक्त नत्र स्थिर करून ३० ते ४० किलो नत्र प्रति हेक्टरी मिळत असते. यामुळे युरिया खताची बचत होऊन उत्पादन खर्च कमी होतो. वनस्पतीमध्ये वाढ वर्धक पदार्थ जमीन तयार करून सोडल्यामुळे पिकाची वाढ जोमाने होते. प्रतिहेक्टरी उत्पादन २० ते ३० टक्क्यांनी वाढ होते. हरितद्रव्य मुक्त हिरवी पानवनस्पती असल्याने हवेत प्राणवायू सोडते व हवा शुद्ध ठेवण्यास मदत करते. दुभत्या जनावरांना दररोज खाद्यान्नामध्ये दिल्यास दुधात फॅटचे प्रमाण वाढते. यामुळे जनावरांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. भंडारा तालुक्यात कृषी सप्ताहात ऍझोला वनस्पतीचे प्रात्यक्षिके दाखवण्यात येत आहेत.